अंगणवाडीत नोकरी देतो म्हणून बोलावलं, जेवणात नशेचं औषध टाकून 20 महिलांवर सामूहिक बलात्कार!
Rajasthan Crime: नोकरी देतो म्हणून महिलांना बोलावून त्यांचे शोषण केले आणि त्यांना धमकावण्यातही आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. नोकरी हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. याचाच फायदा घेत नोकरीच्या बहाण्याने महिलांवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल 20 महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. सिरोही नगरचे सभापती, माजी आयुक्त आणि त्यांच्या मित्रांनी हे गैरकृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.
नोकरी देतो म्हणून महिलांना बोलावून त्यांचे शोषण केले आणि त्यांना धमकावण्यातही आले. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आश्वासन या महिलांना देण्यात आले होते. या घटनेत हायकोर्टने हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापती महेंद्र मेवाडा, आयुक्त महेंद्र चौधरीसहित आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला समोर आल्या असून आपल्या नोकरी देण्यात येणार होती,असे त्यांनी सांगितले. आम्हाला बोलावले, गॅंग रेप केला. एवढेच नव्हे तर सर्व महिलांचा व्हिडीओ बनवल्याची तक्रार पीडित महिलांनी दिली आहे. पोलिसात तक्रार केलात तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला असून तपासाला वेग मिळाला आहे.
हायकोर्टकडून केस दाखल करण्याचे आदेश
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, एका पिडित महिलेने हायकोर्टात तक्रार दाखल केली. सिरोही नगर परिषदेचे सभापती महेंद्र मेवाडा आणि तात्कालिन आयुक्त महेंद्र चौधरी यांनी आंगणवाडीत नोकरीच्या बहाण्याने 15 ते 20 महिलांना बोलावून घेतले.
बेशुद्धावस्थेत महिलांवर गॅंग रेप
या महिलांना एका ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले. त्यांची तिथे खाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर खाण्यातून नशेचे औषध देण्यात आले आणि बेशुद्धावस्थेत महिलांवर गॅंगरेप करण्यात आल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. हायकोर्टने आदेश दिल्यानंतर आता पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.
खाण्यामध्ये नशेचे पदार्थ
आरोपींनी खाण्यातून नशेचे पदार्थ दिले. जेव्हा आम्हाला शुद्ध आली तेव्हा गॅंग रेप झाल्याचे लक्षात आले. आरोपींनी आमचा व्हिडीओ बनवल्याचेही पिडितेने सांगितले आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल केला जाईल, असे आम्हाला धमकावण्यात आले. यामुळे यातील कोणती महिला पुढे येण्यास धजावली नाही. पण आमच्यासोबत आलेल्या सर्व महिलांचा गॅंग रेप झाल्याचा दावा पिडित महिलेने केला आहे.