भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!
Rajasthan Data Hacker : राजस्थानमध्ये जगातल्या सर्वात मोठा हॅकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 21 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आलं आहे. या तरुणाकडे भारतापासून अमेरिकेच्या लष्कराची माहिती सापडली आहे.
Rajasthan Crime News : राजस्थानच्या एका तरुणाने भारतात बसून अमेरिकेतल्या लष्काराला एका कृत्याने घाम फोडला आहे. या तरुणाने सरकार आणि नागरिकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबला विकला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) आरोपीला पकडलं. आयबीने तपासादरम्यान डार्क वेब अकाऊंटमधून अमेरिकन नागरिकांशी संबंधित 90 दशलक्षाहून अधिकचा डेटा आणि इस्लामिक स्टेट्स आणि तालिबानशी संबंधित डेटा जप्त केला आहे. या सगळा प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राजस्थानमध्ये कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. जगातला सर्वात मोठा हॅकर बनायच्या नादात या तरुणाने चक्क आपल्या देशाचा आणि खासगी संस्थांचा डेटा डार्क वेबवर विकून टाकला. मात्र आयबीने राजस्थान पोलिसांच्या मदतीने 25 फेब्रुवारी रोजी त्याला अटक केली. तपासादरम्यान या तरुणाकडे 4500 GB डेटा, 5 लाख आधार कार्ड आणि चार देशांचा संवेदनशील लष्करी डेटा सापडला आहे. दिल्लीतील इंटेलिजन्स ब्युरो आणि राजस्थान पोलिसांचे पथक त्याची चौकशी करत आहे.
राजस्थानच्या श्रीगंगासागर जिल्ह्यातून आरोपीला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. अमित चंद ( 21) असे आरोपीचे नाव आहे. अमितचे वडील दुबईत काम करतात. अमितला सुरुवातीपासून ऑनलाइन गेमिंगची आवड होती. त्यानंतर तो ऑनलाइन गेमिंगचा व्यसनाधीन झाला होता. इंटरनेटवर गेम खेळता खेळता त्याला डार्क वेब आणि डीप वेबची माहिती मिळाली. याच्याबद्दल युट्यूबवरुन त्याने शिकून घेतले आणि तो इतका पारंगत झाला की त्याने ऑनलाइन डेटा चोरणे आणि टेलिग्राम चॅनेलद्वारे विकणे सुरू केले.
आरोपी अमितच्या डेस्कटॉपवर भारतीय लष्कर, अमेरिकन लष्कर आणि भारतीय पोलिसांव्यतिरिक्त देशातील 5 लाखांहून अधिक लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकिंग डेटा भरला होता. अमित चंद हा डार्क वेब व्यवसायात गेल्या 2-3 महिन्यांपासून बराच सक्रिय होता. त्याने यानंतर डेटा डार्क वेबवर विकण्यास सुरुवात केली. अमितने 3 टेलिग्राम चॅनेल सुरु केले होते, ज्याद्वारे तो डार्क वेबला डेटा विकत होता. डेटाच्या बदल्यात तो ग्राहकांना क्रिप्टोकरन्सी देत असे आणि त्या बदल्यात त्याला पैसे मिळत असे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 419, 420 आणि 120ब, आयटी कायद्याच्या कलम 43, 66 ब, 66 क आणि 67 अ अन्वये गुन्हा दाखल केला.
अमित चंदकडे काय काय सापडलं?
आरोपी मोबाइल फोन आणि लॅपटॉपच्या माध्यमातून टेलीग्रामवर केंद्र सरकारशी संबंधित ऑनलाइन डेटा चोरून विकत होता. ही बाब सायबर सेलच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अमितला शोधलं. तपासादरम्यान त्याच्या डेस्कटॉपवर आधार कार्ड डेटा, पॅन कार्ड डेटा, भारतीय महेंद्र कोटक बँक, एचडीएफसी बँक, अमेरिकन नागरिक, युक्रेन, मणिपूर पोलीस, अमेरिकन लष्कर आणि भारत सरकारशी संबंधित डेटा आढळून आला. पोलिसांनी त्याच्या खोलीतून 3 मोबाईल, लॅपटॉप, संगणक, 2 पेन ड्राईव्ह, 5 हार्ड डिस्क आणि 4 SSD जप्त केले आहेत.