कोटा : एक धक्कादायक बातमी. राजस्थानच्या कोटा येथील सरकारी रुग्णालयात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या कुटुंबीयांनी कूलर सुरु करण्यासाठी व्हेंटिलेटर प्लग काढल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यू झालेल्या रुग्णाला कोरोनाव्हायरस  (Coronavirus) संसर्गाच्या संशयावरुन १३ जून रोजी महाराव भीम सिंग (एमबीएस) रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर तपासणी अहवालात त्याला कोरोना विषाणूची लागण झालेली आढळली नाही. आईसीयूमधील आणखी एक रुग्ण कोरोना विषाणूची लागण झाल्याचे लक्षात आल्यावर सावधगिरी म्हणून मृत व्यक्तीला वेगळ्या वॉर्डात पाठविण्यात आले.


दरम्यान, रुग्णालयाच्या दुसर्‍या वॉर्डात खूपच उकाडा होत होता. म्हणून त्याच दिवशी त्याच्या कुटुंबाने एअर कूलर आणला. ज्यावेळी कूलर सुरु करण्यासाठी सॉकेट सापडले नाही तेव्हा तेथे कूलर ठेवण्यासाठी व्हेंटिलेटरचे प्लग काढले. दरम्यान, सुमारे अर्ध्या तासानंतर व्हेंटिलेटरची पॉवर संपल्याने रुग्णाला त्रास झाला.


डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना याची माहिती तातडीने देण्यात आली, त्यांनी रुग्णावर सीपीआरचा प्रयत्न केला, पण त्या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नवीन सक्सेना यांनी सांगितले, तीन सदस्यांची समिती या घटनेची चौकशी करील. रुग्णालयाचे अधीक्षक, नर्सिंग अधीक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्यासह या घटनेची चौकशी करेल. शनिवारी समिती आपला अहवाल सादर करेल.


ते म्हणाले की समितीने दुसर्‍या प्रभागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत. पण मृतांचे नातेवाईक समितीला प्रतिसाद देत नाहीत. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान, रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. समीर टंडन यांनी समितीच्या चौकशीवर भाष्य करण्यास नकार दिला आणि चौकशी सुरु असल्याचे सांगितले.


या घटनेसंदर्भात रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुटुंबाने कूलर बसविण्याची परवानगी घेतलेली नव्हती. जेव्हा रुग्णाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केले.