हैदराबाद: शहाबानो प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशिदीचे टाळे उघडण्याचे आदेश दिले होते, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले. ते मंगळवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात माजी केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचे सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव गांधी यांनी त्यावेळी अयोध्येतूनच आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती. त्यांनीच बाबरी मशिदीचे टाळे उघडण्याचे आदेश दिले, हे ऐतिहासिक तथ्य आहे. यानंतर बाबरी मशिदीचे पतन झाले, तेव्हा काँग्रसचे सरकार होते, याकडे ओवेसी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 


माधव गोडबोले यांनी आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, त्यावेळी राजीव गांधी यांना बाबरी मशीद- राम मंदिर तोडग्यावर मार्ग काढता येणे शक्य होते. कारण त्यावेळी दोन्ही पक्ष फार सामर्थ्यशाली नव्हते. त्यामुळे त्यावेळी एखादा पर्याय दिला असता तर दोन्ही पक्षांनी स्वीकारला असता. त्यावेळी अनेक नेत्यांना राजीव गांधी यांना पर्याय सुचवले होते. मात्र, राजीव गांधी यांना त्यामध्ये कोणताही रस नव्हता. त्यामुळेच राजीव गांधी यांनी बाबरी मशिदीचे टाळे उघडून त्याठिकाणी शिलान्यास स्थापन करण्यास परवानगी दिली. त्यामुळेच माझ्या पुस्तकात मी राजीव गांधी यांचा उल्लेख पहिला कारसेवक असा केला आहे. तर बाबरी मशिदीचे टाळे उघडण्याचा निर्णय देणारे जिल्हा दंडाधिकारी पहिले कारसेवक होते, असे गोडबोले यांनी पुस्तकात म्हटले आहे. 


सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठासमोर अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. सलग ४० दिवस या प्रकरणाची सुनावणी झाली होती. यानंतर १६ ऑक्टोबरला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आता १७ नोव्हेंबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाचा अंतिम निकाल सुनावला जाण्याची शक्यता आहे.