नवी दिल्ली : भारताच्या राजकारणात राजीव गांधी (rajiv gandhi ) यांच्याबाबत बऱ्याच प्रसंगांची नोंद आहे, एक राजकीय नेता म्हणून राजीव गांधी यांची जशी लक्षवेधी ओळख होती, त्याचप्रमाणे एक व्यक्ती म्हणूनही त्यांचा अनोखा अंदाज सर्वांच्या मनावर राज्य करत होता. एक वैमानिक म्हणून ते जितले शिस्तबद्ध होते, तितकेच एक प्रियकर म्हणून आपल्या प्रेयसीवर अर्थात सोनिया यांच्यावर भरभरुन प्रेमही करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द लोटस इयर्स - पॉलिटिकल लाइफ़ इन इंडिया इन द टाइम ऑफ़ राजीव गांधी' या पुस्तकात लेखक अश्विनी भटनागर यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. जिथं त्यांचं विमानाच्या वेगानं कार चालवणं असो, कॉकपिटमध्ये असताना आपली ओळख 'राजीव' इतकीच सांगणं असो किंवा मग महाविद्यालयीन दिवसातच प्रेमात पडण असो. हे मुद्दे वाचताना यातून राजीव गांधी नावाचा राजकीय नेता नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही अनेकांची मनं जिंकतात. 


राजीव गांधी ज्यावेळी इंजिनियरिंगमधील पुढील शिक्षण घेण्यासाठी केंब्रिजला गेले तेव्हा 1965 मध्ये तिथे त्यांची ओळख मुळच्या इटायन असणाऱ्या मुलीशी झाली. ही मुलगी म्हणजे सोनिया गांधी. या मुलीला पाहताच राजीव तिच्यावर भाळले होते. हे दोघंही एका ग्रीक रेस्तराँमध्ये जायचे.


अश्विनी भटनागर यांनी उल्लेख केल्यानुसार त्यांनी रेस्तराँचे मालक चार्ल्स अँटनी यांच्याशी बोलून सोनिया यांच्या जवळच्या टेबलावर बसण्याची सोय करण्याचं सांगून आपली व्यवस्था करुन घेतली होती. या कामासाठी चार्ल्स यांनी राजीव गांधी यांच्याकडून दुपटीनं पैसेही घेतले होते. थोडक्यात सोनिया यांच्याशी जवळीक साधण्यासाठी राजीव गांधी लाच देत होते. 


राजीव गांधी यांचं सोनियावर अतोनात प्रेम होतं. ज्यासाठीच ते हा सारा आटापिटा करत होते. सोनिया गांधी यांना भेटण्यास जाण्यासाठी ते सायकलचा वापर करायचे. म्हणे केंब्रिजमध्ये शिक्षणासाठी असताना खर्च भागवण्यासाठी त्यांनी आईस्क्रिमही विकलं. 


सोनिया गांधी (sonia gandhi ) यांच्या सौंदर्यानं घायाळ झालेल्या राजीव गांधी यांनी त्यांच्यासाठी एका रुमालावर कविताही लिहिली होती. प्रख्यात पत्रकार रशीद किडवई यांनी सोनिया गांधी यांच्या जीवनावर लिहिलेल्या एका पुस्तकात यासंदर्भातील उल्लेख केला होता. कविता पोहोचवमण्याचं काम राजीव यांच्या एका जर्मन मित्रानं केलं होतं. सोनिया गांधी यांना कल्पनाही नव्हती की, राजीव गांधी हे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र आहेत. 


बराच काळ लोटल्यानंतर वर्तमानपत्रात इंदिरा गांधी यांचा फोटो छापून आला होता. त्यावेळी ही आपली आई असल्याचं त्यांनी सोनियांना सांगितलं होतं. त्याचवेळी केंब्रिजमध्ये शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्यानं सोनिया यांना इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा कुठं आपण ज्या मुलाच्या प्रेमात आहोत तो नेमका कोण आहे याची ओळख सोनियांना पटली होती.