राजनाथ सिंह यांच्या भाषणादरम्यान राम मंदिरच्या जोरदार घोषणा (व्हिडीओ)
अचानक सुरू झालेल्या नारेबाजीमुळे राजनाथ सिंह थोड्यावेळासाठी भांबावले.
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रविवारी गृह मंत्री राजनाथ सिंह यांना अजब प्रकाराचा सामना करावा लागला. राजनाथ सिंह हे युवा कुंभमध्ये जनतेला संबोधित करत होते. त्यावेळी उपस्थितांनी राम मंदिरचे नारे लावण्यास सुरूवात केली. अचानक सुरू झालेल्या नारेबाजीमुळे राजनाथ सिंह थोड्यावेळासाठी भांबावले. त्यावेळी मंचावर उपस्थित इतर नेत्यांनी लोकांना जागेवर बसण्याची विनंती केली पण बराचवेळ हे नाट्य सुरूच राहिलं.
मोठ्याने घोषणा
लोकांचे नारे थांबण्याचे नावच घेत नव्हते तेव्हा राजनाथ सिंह बुचकळ्यात पडले. अखेर लोकांना समजवण्यासाठी त्यांनी 'बनणार, बनणार' असे म्हटले. बनणार, बसून घ्या असे म्हणत त्यांनी उपस्थितांना विश्वास दिला. राम मंदिरच्या घोषणेवर राजनाथ सिंह यांनी दिलेले उत्तर पाहून लोक आणखी मोठ्याने घोषणा देऊ लागले.
रविवारी युवा कुंभमध्ये योगी आदित्यनाथ यांनी देखील भाषण केलं. काही लोक म्हणतात आम्ही त्यांनाच मत देऊ जे राम मंदिर बांधतील, मी तुम्हाला विश्वास देतो हे कार्य जेव्हाही होईल आमच्या शिवाय कोणीही करणार नाही', असे योगींनी म्हटले.
कुंभ 2019
प्रयागराजमध्ये 2019 मध्ये होणाऱ्या कुंभ मध्ये घाण तर सोडाच एक मच्छर देखील दिसणार नाही असे योगींनी सांगितले. भारताच्या प्रत्येक संप्रदाय धर्माचार्यचे प्रतिनिधित्व कुंभ मध्ये असेल. 70 हून अधिक देशांचे राजदूत इथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांना पहिल्यांदाच अक्षय वट आणि राजदूत कुंभचे दर्शन मिळणार आहे.
कुंभ हा पर्यावरण विरोधी असल्याचे काहींचे म्हणणे आहे म्हणून सर्वात आधी पर्यावरण कुंभचे आयोजन केल्याचे योगींनी सांगितले. तसेच आम्ही 1 लाख जणांना नोकरी दिली. 5 लाख जणांना सम्मान जनक रोजगाराच्या दिशेने नेल्याचेही ते यावेळी म्हणाले.