नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भेटीगाठी सुरू झाल्यात. राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. यावेळी सोनिया गांधींच्या निवासस्थानी राज्यसभेत काँग्रेसचे गटनेते गुलामनबी आझाद आणि लोकसभेतले नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीत कुठल्याही नावावर चर्चा झालेली नाही, असं खरगेंनी बैठकीनंतर सांगितलं. पण नावं सांगितल्याशिवाय एकमत होणं शक्य नसल्याचंही काँग्रेसनं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारनं नेमलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या समितीनं विरोधी पक्षांशी चर्चा सुरू केलीये.


ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सरकारनं सर्व विरोधी पक्षांना मान्य असेल, असा उमेदवार द्यावा असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे राजनाथ सिंह आणि नायडू यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली.