नवी दिल्ली : देशभरात मोठ्या प्रमाणात होणारी धर्मांतरं रोखण्याची गरज आहे असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते राष्ट्रीय ईसाई महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कोणाला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असेल तर करू दे पण मोठ्या प्रमाणात लोक धर्मांतर करायला लागले तर देशासाठी ही काळजीची गोष्ट आहे असे राजनाथ सिंह म्हणाले.  सरकार कोणाच्या बाबतीत भेदभाव करणार नाही असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. मी कधी माझ्या आयुष्यात जाती, धर्म किंवा वर्णाच्या आधारावर भेदभाव केला नाही. आम्हाला मतं मिळो अथवा न मिळो, सरकार येवो अथवा न येवो आम्ही लोकांमध्ये भेदभाव करणार नाही हे पंतप्रधानांचे म्हणणे असल्याचेही त्यांनी सांगितले.


भेदभाव नको


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर एखाद्याला कोणता धर्म स्वीकारायचा असेल तर त्याने तसे करावे. त्यावर कोणतीही अडचण नाही. पण सामूहिक धर्मांतरण सुरू होते तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक धर्म बदलायला सुरूवात करतात. हे कोणत्याही देशासाठी चिंताजनक आहे. ब्रिटन आणि अमेरिकेसहित जवळजवळ सर्वच देशांमध्ये अल्पसंख्यांक हे धर्मांतरण विरोधी कायद्याची मागणी करतात. भारतातही अशी मागणी होत असल्याचे ते म्हणाले. लोकांच्या मनात भितीचे वातावरण पसरवले जात आहे. भाजप आली आता गडबड होणार. हे होईल, ते होईल. आम्ही घाबरून देश चालवू शकत नाही. आपल्याला विश्वासाने देश चालवायचा आहे. कोणाच्या मनात भेदभावाची भावना नसायला हवी, हाच आमचा प्रयत्न असल्याचे राजनाथ म्हणाले. 



काही दिवसांपूर्वीच चर्च वर दगड फेकण्याच्या घटना घडल्या. काही पादरींनी माझ्याकडे सुरक्षेची मागणी केली. दगडफेकीत सहभागी सर्वांवर कडक कारवाईचे मी त्यांना आश्वासन दिले. आम्ही त्यांना सुरक्षेचा विश्वास दिला. पण विधानसभा निवडणूकीच्या एक महिना आधी दगडफेक सुरु झाली आणि त्यानंतर एक महिन्यांनी थांबली देखील. यावर तुम्ही काय म्हणाल ? हे जाणिवपूर्वक केलं जातंय का ? असे प्रश्नही राजनाथ सिंह यांनी उपस्थित केले.