नवी दिल्ली: राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी सोमवारी लोकसभेत करण्यात आली. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला. आता या प्रस्तावावर केंद्र सरकार काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर आणि पर्यायाने महाराष्ट्राला आधुनिकतेचा चेहरा मिळवून देण्यात राजर्षी शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे. सामाजिक उत्थान, कलाश्रय, स्वातंत्र्यलढय़ाला योगदान, राधानगरी धरणाची उभारणी, शाहू छत्रपती स्पिनिंग अ‍ॅण्ड विव्हिंग मिलची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जाची सोय, असे अनेक दूरदृष्टी असलेले उपक्रम त्यांनी राबवले होते. 


दीन, दलित, दुबळ्यांच्या उद्धारासाठी शिक्षण गरजेचे असल्याने त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले. महात्मा फुले यांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आधार घेऊन शैक्षणिक कार्य सुरू केले. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे काढली.