मुंबई : हैदराबादमध्ये 26 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टर तरूणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा मृतदेह जाळण्यात आला. या प्रकारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींनी केलेल्या घृणास्पद प्रकारामुळे त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी सामान्यांची मागणी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेचे पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांकडून या घटनेचा निषेध म्हणून निदर्शने केली जात आहेत. एवढंच नव्हे तर त्या आरोपींना फाशी व्हावी यासाठी आग्रह देखील धरला जात आहे.  दोन्ही सभागृहातील नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 



'त्या बलात्कारींना झुंडीच्या हवाली करा, त्यांचा झुंडबळी जाऊ दे', अशी संतप्त प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोषींना कठोर शिक्षा होणार. त्यांना फाशी देण्यासाठी कायदा आणखी कडक करायला हवा अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी लोकसभेत व्यक्त केली आहे. सगळ्यांच्या प्रतिक्रियेनंतर लोकसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले,'अशा प्रकारच्या अमानुष घटना कायद्याद्वारे नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीद्वारे निकाली काढल्या जाऊ शकतात.'


या घटनेचे पडसाद सगळीकडेच उमटत आहेत. आरोपींच्या पालकांनी देखील आपती प्रतिक्रिया दिली आहे. 'जर आमची मुलं दोषी असतील, तर त्यांना जाळून टाका' अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. केशवुलू याच्या आईने आपल्या मुलाला देखील जाळून टाका अशी प्रतिक्रिया देत आम्ही त्या आईचं दुःख देखील समजून आहोत, अशी भावना व्यक्त केली आहे.