नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या सहा जागांपैकी अपक्ष म्हणून जागा लढविण्याचा निर्णय छत्रपती संभाजी यांनी घेतला आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. यात शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 106 आमदारांस, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार असे एकूण 113 आमदार आहेत.


राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. यानुसार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एक आणि भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर सहज जाऊ शकतात.


मात्र, उरलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून येऊ शकतो आणि याच जागेवर छत्रपती संभाजी यांनी आपली उमेदवारी जाहीर केलीय. मात्र, ही जागा आता शिवसेना लढविणार आहे. तसेच, भाजपनेही तिसरा उमेदवार जाहीर केल्यास ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.


शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची बैठक शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी बोलवली आहे.


तर, भाजपनेही तिसरी जागा लढण्यासाठी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत असली तरी त्यांच्याकडूनही मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे समजते.


राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भता म्हटलंय की, राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार देण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. महाराष्ट्रातून भाजपच्या दोन जागा येतच आहेत. पण, तिसऱ्या जागेबाबत निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईन. आम्ही संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. अशा असे काही जे निर्णय असतात ते केंद्रीय स्तरावर घेण्यात येतात. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकारही केंद्रीय नेतृत्वाकडे आहेत, असे त्यांनी सांगितले.