मुंबई : दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांचा आज जन्म दिवस आहे. शेअरमार्केटचे बिग बुल असं त्यांना संबोधलं जातं. 5 जुलैला ते 61 वर्षाचे झाले आहेत. तसेच भारतीय शेअर मार्केटमध्ये त्यांनी आपले 36 वर्ष पुर्ण केले आहे. बिगबुल राकेश झुनझूनवाला यांनी 1985 मध्ये दलाल स्ट्रीटपासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. तेव्हा BSE सेंसेक्स 150 अंकाच्या आसपास होता. त्यांच्या करिअरीच सुरूवात त्यांनी 5000 रुपयांपासून केली होती. आज त्यांच्याकडे 34 हजार कोटींपेक्षा अधिकची संपत्ती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारवाडी परिवारात झाला बिगबुलचा जन्म
राकेश झुनझूनवाला (Rakesh Jhunjhunwala Birthday) यांना भारतीय शेअर बाजारचा बादशाह म्हटले जाते. तसेच त्यांना भारताचे वॉरेन बफे देखील म्हटले जाते. शेअर मार्केटमधील असंख्य लोक त्यांना आपला आदर्श तसेच गुरू देखील मानतात.  5 जुलै 1960 ला मुंबईत त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडिल भारत सरकारमध्ये इनकम टॅक्स विभागात कार्यरत होते. तेव्हा पासून ते आपल्या वडिलांशी शेअर बाजारातील घडामोडींविषयी चर्चा करीत असत.


वडिलांनी शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्यासाठी पैसे दिले नाहीत
राकेश यांनी सिडेनहॅम कॉलेजमध्ये कॉमर्समधून डिग्री घेतली. त्यानंतर 1985 मध्ये इंन्स्टिट्युट ऑफ चार्टड अकॉंऊंटंट ऑफ इंडियाची सीएची सनद मिळवली. त्यानंतर शेअर बाजारात उतरण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. परंतु वडिलांनी म्हटले की, मी तुला या कामासाठी पैसे देणार नाही. अन् तू तुझ्या कोणत्याही मित्राकडून या कामासाठी पैसे घ्यायचे नाही. तू स्वतः पैसे कमावून आपल्या पैशांनी शेअर बाजारात काम करावे.


Tata Tea च्या शेअर पासून झाली पहिली कमाई
राकेश यांनी 1985  मध्ये बाजारात काम करणे सुरू केले. सर्वात आधी त्यांनी 5000 रुपये गुंतवले. आणि 1986 मध्ये आपला पहिला नफा कमावला. पहिली मोठी कमाई त्यांनी टाटा कंपनीचे 5000 शेअर घेऊन केली. 43 रुपयांचे शेअर त्यांनी 143 रुपयांना विकले.  त्यानंतर सेसा स्टारलिट या कंपनीच्या शेअर्समधूनही त्यांना चांगला नफा झाला.


टायटनने बनवले बिगबुल
2003 मध्ये राकेश झुनझूनवाला यांनी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. हा शेअर त्यांचे नशिब उघडणारा ठरला. त्यांनी 6 कोटी शेअर ३ रुपयांच्या भावात खरेदी केले. आज या शेअरची किंमत 1752 रुपये इतकी आहे. वॅल्युच्या हिशोबाने ही त्यांची सर्वात मोठी होल्डिंग आहे.फोब्सच्या मते 3 जुलै 2021 पर्यंत राकेश यांची नेट वर्थ साधारण 34 हजार कोटी इतकी आहे.