नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम करताना कुठेही लोखंडाचा वापर केला जाणार नाही. पुढील 1000 वर्षांचा विचार करुन मंदिराचं बांधकाम करण्यात असल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिराचं बांधकाम करताना माती, पाणी तसंच इतर अनेक प्रभावांचं मूल्यांकन केलं जात आहे. 10 ते 12 ठिकाणी 60 मीटर खोलीपर्यंत मातीची चाचणी घेण्यात आली आहे. याआधारे मंदिरात भूकंप प्रतिरोधकाचा अभ्यासही करण्यात आला आहे. राम मंदिराचं बांधकाम लार्सन अँड टूब्रो कंपनी करणार आहे. मंदिर बांधकामासाठी CBRI रुडकी आणि आयआयटी मद्रास यांचे पूर्ण सहकार्य घेतले जात आहे. मातीच्या क्षमतेचं मोजमाप करण्यासाठी आयआयटी मद्रासकडून सल्ला घेतला जात असल्याची, माहिती चंपत राय यांनी दिली.



अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम करताना दगडांचांच वापर करण्यात येणार आहे. मंदिराचं बांधकाम करताना केवळ दगड जोडण्यासाठी तांब्याचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी भाविकांना मदत करायची असल्याची तांबे दान करण्याचंही सांगण्यात आलं आहे. 



दगडांपासून बांधल्या जाणाऱ्या या मंदिराचं वारा, सूर्यप्रकाश, पाण्यामुळे नुकसान होणार नाही आणि मंदिर हजारो वर्ष उभं राहील, अशाप्रकारे बांधलं जाणार आहे. तसंच बांधकामावेळी, सर्व कामांमध्ये तज्ज्ञ जोडले असून त्यांचा सल्ला घेत, पूर्ण विचार करुन बांधकाम केलं जाणार असल्याचं चंपत राय यांनी सांगितलं. तसंच मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी जवळपास 36 ते 40 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असंही ते म्हणाले.