अयोध्येत सरयू नदी किनारी २५१ मीटर उंच राम मुर्तीची स्थापना होणार
अयोध्येत सरयू किनारी होत असलेल्या राममंदिरात रामाची भव्य मूर्ती स्थापण्यात येणार
नवी दिल्ली : अयोध्येत सरयू किनारी होत असलेल्या राममंदिरात रामाची भव्य मूर्ती स्थापण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रामाच्या मूर्तीची निर्मिती ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार करणार आहेत. देशातली सर्वात उंच राममूर्ती निर्माण करण्याची जबाबदारी मराठमोळ्या राम सुतार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. २५१ मीटर उंच अशी ही रामाची मूर्ती असणार आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणीचा बऱ्याच वर्षांपासूनचा खटला निकाली निघाल्यानंतर आता राम मंदिर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी वेगाने सुत्र हलत असून आता रामाच्या मुर्तीची जागा आणि उंची देखील निश्चित झाली आहे. राम जन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवर हिंदूंचा हक्क सांगत ही जागा राम मंदिरासाठीच देण्यात आली आहे. तीन महिन्यांमध्ये आत ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेशही न्यायालयाने दिले होते.
वादग्रस्त जमीन हिंदूंना देण्यासोबतच मुस्लीम समुदायासाठी पाच एकर स्वतंत्र जमीन देण्याची तरतूदही सर्वोच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयात करण्यात आली. अयोध्येतच ही जमीन देण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलं. साऱ्या देशाचं लक्ष लागेल्या या निर्णयाच्या सुनावणीनंतर राजकीय वर्तुळात त्याचे प़डसाद उमटल्याचं पाहायला मिळालं.