अयोध्या : हनुमान जयंतीचं औचित्य साधून श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने बुधवारी लोगोचं अनावरण केलं आहे. श्रीरामाच्या सूर्यवंशी परंपरा लक्षात घेऊन हा लोगो तयार करण्यात आला आहे. या लोगोमध्ये वाल्मिकी रामायणातील पंक्ती 'रामो विग्रहवान धर्म:' लिहिण्यात आलं आहे. याचा अर्थ भगवान श्रीराम धर्माचे मूर्त स्वरूप आहेत. ट्रस्टच्या या लोगोमध्ये श्रीरामासोबतच हनुमानही आहेत. लोगोमध्ये श्रीरामाच्या फोटोसोबत हनुमानाचा सेवक मुद्रेतला फोटो लावण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवान श्रीराम सूर्यवंशी असल्यामुळे लोगोमध्ये सूर्यवंशाचं प्रतिक असलेल्या रंगांचाही वापर करण्यात आला आहे. लोगोमध्ये भगव्या आणि पिवळ्या रंगाच्या सूर्यामध्ये श्रीरामाचा फोटो दाखवण्यात आला आहे. भगवा आणि पिवळा रंग सूर्यवंशी राजांची ओळख असल्याचं मानलं जातं.



ट्रस्टच्या लोगोमध्ये श्रीरामाच्या फोटोच्या खाली हनुमान दोन्ही ठिकाणी बसलेले दाखवण्यात आले आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधलं जाईल तेव्हा त्याची रक्षा हनुमान करेल, असा अयोध्यातल्या भक्तांचा समज आहे. म्हणूनच भक्त हनुमानगढीमध्ये दर्शन केल्यानंतरच राम जन्मभूमीचं दर्शन घेण्यासाठी जातात.


'हा लोगो भगवान श्रीरामाचं जीवन चरित्र सांगतो. ट्रस्टच्या अधिकृत कामकाजासाठी या लोगोचा वापर करायला सुरुवात केली आहे,' असं ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्र यांनी झी न्यूजशी बोलताना सांगितलं.


राम मंदिर ट्रस्टची बैठक ४ एप्रिलला प्रस्तावित होती, पण कोरोना व्हायरसमुळे ही बैठक अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे.