चंडिगड : बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान शिक्षेची सुनावणी होत असताना राम रहिम न्यायालयामध्ये रडला. आणि आपण चांगलं काम केल्यामुळे मला शिक्षेत सूट मिळावी अशी मागणी त्यानं न्यायालयात केली. राम रहिम हा सीबीआयचा कैदी नंबर १९९७ असणार आहे. इतर कैद्यांप्रमाणेच बाबा राम रहिमला जेलमध्ये काम करावं लागणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी सीबीआयच्या न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरविले होते. या निकालानंतर राम रहीमच्या अनुयायांनी ठिकठिकाणी हिंसक कारवाया केल्या. या हिंसाचारातील मृतांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे. या निकालानंतर अफवा पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पंजाब व हरियाणामधील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली.


प्रतिबंधात्मक आदेश मोडणाऱ्या राम रहीमच्या पाच अनुयायांना अटक करण्यात आली. रामरहीमचे काही अनुयायी शनिवारी रात्री उत्तम धर्मशाला येथे जमले होते. तेथे त्यांनी एक बैठक घेतली. यानंतर सरकारविरोधी घोषणा देत ते पाराव चौकाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.


मात्र, हिंसक प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही व राज्यात शांतता राखणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, अशी ग्वाही हरयाणाचे पोलिस महासंचालक बी. एस. संधू यांनी दिली. हरियाणात सुरक्षात्मक उपाय म्हणून आज येथील सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. रोहतक येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून न्यायालयाच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग सील करण्यात आले आहेत, असे संधू यांनी सांगितले.