हनीप्रीत अचानक झाली गायब, पोलिसांना सापडली चिठ्ठी
रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दोषी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची `मानलेली मुलगी` हनीप्रीत इन्सान उर्फ प्रियांका तनेजा अचानक गायब झालीय. पोलिसांनी तिचा तपास सुरू केलाय.
नवी दिल्ली : रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दोषी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची 'मानलेली मुलगी' हनीप्रीत इन्सान उर्फ प्रियांका तनेजा अचानक गायब झालीय. पोलिसांनी तिचा तपास सुरू केलाय.
हनीप्रीत गुरुग्रामच्या एखाद्या ब्लॉकमध्ये लपून बसलेली असू शकते, असा संशय हरियाणा पोलिसांना आहे. हनीप्रीतला पकडण्यासाठी चार टीम बनवण्यात आल्यात आदित्य इन्सान हादेखील हनीप्रीतसोबत असू शकतो, असाही संशय पोलिसांनी आहे. नेपाल बॉर्डरहून हनीप्रीत भारताबाहेर जाण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे पोलिसांनी तिथंही फिल्डिंग लावलीय.
देशद्रोही हनीप्रीत
पंचकुला पोलिसांनी हनीप्रीतविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. तसंच तिच्यावर राह रहीमला कोर्टातून पळवण्याचा कट रचण्याचा आणि पंचकुलामध्ये हिंसा घडवून आणण्याचाही आरोप आहे. हनीप्रीतसोबत डेराचा पदाधिकारी आदित्य इन्सान याच्याविरुद्ध लुकआऊट नोटिस जाहीर करण्यात आलंय.
पोलिसांना सापडली चिठ्ठी
हनीप्रीतचा शोध घेताना पोलिसांना एक चिठ्ठीही सापडलीय. संदेश लिहून तिनं त्यावर स्वाक्षरीही केलीय. 'मी हनीप्रीत इन्सान पुत्री गुरमीत राम रहीम इन्सान सुखरुप आहे आणि फतेहाबादचा कॉन्स्टेबल विकास ३/७८३ सोबत जातेय' असं या चिठ्ठीत तिनं म्हटलंय.
तर चिठ्ठीत कन्स्टेबल विकासनं लिहिलंय आम्ही बाबा राम रहीमची मुलगी हनीप्रीतला आपल्या सोबत तारीख २५/०८/२०१७ ला सुखरुप आपल्या जबाबदारीवर आणि हनीप्रीतच्या मर्जीनं घेऊन जात आहोत. तिला तिच्या घरी पोहचवण्याची जबाबदारी आमची आहे.
या चिठ्ठीवरून हे स्पष्ट होतंय की हनीप्रीतनं २५ ऑगस्ट रोजी गुरमीत राम रहीमला दोषी ठरवलं गेल्यानंतर त्याच दिवशी गायब होण्याचा प्लान बनवला होता. ही चिठ्ठी तिनं जेल सोडण्यापूर्वी जेल प्रशासनाला लिहिलीय.