जयपूर: इंधन दरवाढीमुळे जनतेमध्ये निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे विचका झाला आहे. रामदास आठवले यांनी एक वादग्रस्त विधान करुन या आगीत आणखीनच तेल ओतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाही. कारण मंत्री असल्यामुळे मला ते फुकटात मिळते. कदाचित माझे मंत्रीपद गेल्यानंतर मला त्याची झळ बसेल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता इंधन दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंधनांच्या दरांमध्ये कपात झाली पाहिजे, असे शहाजोग विधान आठवले यांनी केले. ते जयपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


यावेळी आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी गुजरात वगळता नरेंद्र मोदींनी विशेष काम केले नव्हते. मात्र, पंतप्रधान म्हणून गेल्या साडेचार वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर ते २०१९ मध्ये निवडणुकीला सामोरे जातील. तेव्हा भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे आठवले यांनी सांगितले.