हरिद्वार: केंद्र सरकारने अध्यादेश न काढल्यास लोक स्वत: राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करतील. त्यामुळे देशातील वातावरण बिघडेल, असा इशारा योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला. ते शनिवारी हरिद्वारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, विश्व हिंदू परिषद (विहिंप) , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्यावरून सरकारवर दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे सरकारने अध्यादेश काढून राम मंदिरासाठी जमीन अधिग्रहण करावे. तरच अयोध्येत राम मंदिर उभारणे शक्य आहे. अन्यथा लोकांच्या संयमाचा बांधा फुटेल. यानंतर ते स्वत: मंदिराची उभारणी सुरु करतील आणि त्यामुळे देशातील वातावरण बिघडेल, असे रामदेव बाबा यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिराच्या मुद्द्यावरून अयोध्येत राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते या शहरात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रविवारी विश्व हिंदू परिषदेतर्फे अयोध्येत धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 


या सभेला संघ आणि विहिंपचे दोन लाखांहून अधिक कार्यकर्ते अयोध्येत एकत्र येतील, असा दावा केला जातोय. संघाचे जवळपास एक लाख, तसेच विश्व हिंदू परिषदेचेही तितकेच कार्यकर्ते अयोध्येत पोहोचणार आहेत. याशिवाय, साधू-संतही मोठ्या संख्येने येतील. या सभेला मुस्लिमही मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यांची जबाबदारी मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडे सोपवण्यात आली आहे.