देशात ब्रह्मचारी व्यक्तींचा सन्मान व्हावा, एकटा हजारांना भारी पडतो- रामदेव बाबा
तेव्हा जास्त मुलं जन्माला घालणं ठीक होतं
नवी दिल्ली: आयुष्यभर ब्रह्मचारी राहणाऱ्या व्यक्तींचा देशात विशेष सन्मान झाला पाहिजे, असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. ते रविवारी हरिद्वार येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आमच्याप्रमाणे आयुष्यभर अविवाहित राहणाऱ्या व्यक्तींना विशेष आदर मिळाला पाहिजे. तसेच लग्न झाल्यानंतर दोनपेक्षा जास्त अपत्यांना जन्म देणाऱ्या लोकांना मतदानाचा हक्क नाकारला पाहिजे, असे रामदेव बाबा यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी देशातील वाढत्या लोकसंख्येच्या मुद्द्यावरही भाष्य केले. जेव्हा भारताची लोकसंख्या कमी होती तेव्हा, जास्त मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला जात होता, वेदांमध्येही याचा उल्लेख आहे.
अजूनही ज्यांना याची गरज वाटते किंवा ज्यांच्याकडे इतके सामर्थ्य आहे, त्यांनी हे जरुर करावे. मात्र, आता देशाची लोकसंख्या १२५ कोटी इतकी झाली आहे.
मात्र, एखादा पुरुष किंवा स्त्री प्रज्ञावंत आणि विवेकी असेल तर ते लाखोंना भारी पडू शकतो, असे रामदेव बाबा यांनी सांगितले.
रामदेव बाबा यांनी यापूर्वी याबाबतचे वक्तव्य केले आहेत. अविवाहित असणे हेच आपल्या यश आणि सुखाचे रहस्य असल्याचं रामदेव बाबांनी यापूर्वी म्हटले होते. आनंदी राहण्यासाठी पत्नी आणि मुलांची गरज नाही. अविवाहित असतानाही आपण सुखी राहू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते.