नवी दिल्ली : पुढचा एक महिना टीव्ही वाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलाय. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय. आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील वादविवाद कार्यक्रमात बोलावण्यात येऊ नये, असं आवाहन सर्व वृत्तवाहिन्यांना करण्यात आलंय. पराभवानंतर काँग्रेसनं मौनव्रत धारण करणं पसंत केल्याचं यातून दिसून येतंय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पुढचा महिनाभर कोणत्याही वाहिन्यांवर चर्चेत सहभागी होण्यसाठी पक्षातून कोणत्याही प्रवक्त्यांना पाठवण्यात येऊ नये, असा निर्णय काँग्रेसनं घेतलाय. सर्व वाहिन्यांना आणि संपादकांना विनंती  आहे की त्यांनी काँग्रेस प्रतिनिधींना सहभागी करू नये' असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय. 



यापूर्वी समाजवादी पक्षानंही असाच निर्णय घेत आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरच्या कोणत्याही चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा आदेश दिलाय. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं हा निर्णय घेतलाय. काही मीडिया संस्था या निष्पक्ष नसल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अनेकदा केलाय. काँग्रेसमध्ये आपल्या पराभवाच्या कारणांवर मंथन सुरू आहे. तर काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर अडून आहेत.