Ransomware Attack: परदेशात सायबर हल्ल्याच्या घटना वारंवार पहायला मिळतात. भारतात देखील याचा प्रभाव वाढत असल्याचं दिसतंय. अशातच आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असलेल्या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सी-एज टेक्नॉलॉजीज ही कंपनी अनेक छोट्या आणि स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असल्याने बँकांच्या पेमेंट सिस्टमवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या बँकांचे ग्राहक सध्या पेमेंट करू शकत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, 300 हून अधिक स्थानिक बँकांच्या सेवा प्रभावित झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआय आणि टीसीएसच्या संयुक्त उपक्रम सी-एजवर अवलंबून असलेल्या सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या ग्राहकांना याचा फटका बसला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. पणइतर बँकिंग सेवा सामान्यपणे कार्यरत आहेत, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सी-एजची समस्या भेडसावत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. रॅन्समवेअर हल्ल्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही, त्यामुशे ग्राहकांनी सुटकेचा श्वास घेतलाय.


कोणत्याही कॅस्केडिंग प्रभावापासून बचाव करण्यासाठी सुमारे 300 लहान बँकांना देशाच्या व्यापक पेमेंट नेटवर्कपासून वेगळे केले गेले आहे, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने निवेदनात म्हटलं आहे. सी-एज सेवा घेणाऱ्या बँकांचे ग्राहक आयसोलेशनच्या काळात पेमेंट सिस्टम वापरू शकणार नाहीत, अशी माहिती देखील  नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिली आहे. त्यामुळे आता खातेदारांच्या चिंता वाढल्या आहेत.



दरम्यान, आरबीआय आणि भारतीय सायबर प्राधिकरणांनी काही आठवड्यांपूर्वी भारतीय बँकांना संभाव्य सायबर हल्ल्यांबाबत चेतावणी दिली होती, अशी माहिती देखील मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. त्यामुळे आता या हल्ल्याला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.