नवी दिल्ली : कॅनडाहून भारत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणीवर हॉस्टेलच्या डॉर्मेटरी कॉर्डिनेटरनं दारुच्या नशेत दिल्लीत बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलंय. मंगळवारी रात्री ही घटना घडलीय. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक बंटे याला अटक केलीय. बुधवारी त्याला कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागात ही घटना घडलीय. कॅनडाची रहिवासी असेलली १९ वर्षीय तरुणी भारतात आली होती. ती वेब डिझायनिंगचं प्रशिक्षण घेतेय. ४० दिवसांपूर्वी टूरिस्ट व्हिजावर ती एका ग्रुपसोबत भारतात आली होती. हा ग्रुप दोन दिवसांपूर्वी दिल्लीत दाखल झाला होता.  


हा ग्रुप रात्रीच्या वेळेस सफरदरजंग एन्क्लेव्हच्या हौजखास स्थित 'ओरो पब'मध्ये पार्टी करण्यासाठी दाखल झाला होता. इथं डॉर्मेटरी चालवणारा अभिषेक बंटे नावाचा इसमही काही लोकांना घेऊन दाखल झाला होता. इथं त्याची या तरुणीशी ओळख झाली... दोघांनी एकमेकांचे नंबरही शेअर केले. त्यानंतर एक कॅब बुक करून अभिषेक या तरुणीला लक्ष्मीनगर स्थित हॉस्टेलला घेऊन गेला... आणि इथं त्यानं तरुणीवर बलात्कार केला. 


यानंतर तरुणीनं स्वत:ची सुटका करून घेत रात्री उशिरा एम्स हॉस्पीटल गाठलं. त्यानंतर या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मेडिकल चाचणीत तरुणीचे आरोप खरे ठरलेत. त्यानंतर पोलिसांनी अभिषेकला अटक केलीय. 


'महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश'


उल्लेखनीय म्हणजे,  नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन'च्या सर्व्हेनुसार लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांत भारत महिलांसाठी 'सर्वात असुरक्षित देश' असल्याचं म्हटलंय. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, युद्धाने जेरीस आलेले देश अफगाणिस्तान दुसऱ्या आणि सिरिया तिसऱ्या स्थानी आहे. सर्व्हेत अॅसिड अटॅक, महिलांचा लैंगिक छळ, बालविवाह, शारीरिक अत्याचार प्रकरणांमध्ये भारत असुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं. भारतानंतर क्रमांक लागतो तो अफगानिस्तान, सीरिया, सोमालिया, सौदी अरब, पाकिस्तान, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, यमन, नायजेरिया आणि दहाव्या क्रमांकावर अमेरिका आहे.