पंचकुला : रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुरमीत राम रहीम आज पुन्हा एकदा न्यायालयात फैसला होणार आहे. डेरा प्रमुखाचा अनुयायी आणि डेरा मॅनेजर रंजीत सिंह आणि सिरसाचा पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा आरोपही गुरमीतवर आहे. याच प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयानं २५ ऑगस्ट रोजी दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी रामरहीमला दोषी करार देऊन त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर रामरहीमचे अनुयायांनी ठरवून हिंसाचार सुरू केला होता. या दरम्यान ३८ जणांचा मृत्यू झाला तर जवळपास २६४ जण जखमी झाले होते. जवळपास १०० गाड्या आगीत झोकून देण्यात आल्या होत्या. मीडियाच्या गाड्यांचंही यावेळी नुकसान करण्यात आलं. यानंतर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं हिंसेत झालेल्या नुकसानाची भरपाई डेरा सच्चा सौदाकडून केला जावा, असा आदेशही दिला होता. 


गुरमीत सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असला तरी सुनावणी दरम्यान शहराची सुरक्षा लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवलीय. हरियाणाचे पोलीस महासंचालक बी एस संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे...


सिरसाचा पत्रकार छत्रपती यांनी आपल्या 'पूरा सज' वर्तमानपत्रातून एक बेनामी पत्र छापलं होतं... ज्यात रामरहीमच्या गु्न्ह्यांचा पाढा वाचण्यात आला होता. त्यानंतर त्यांची ऑक्टोबर २००२ मध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती. तर डेराचा मॅनेजर रणजीत सिंह याचीही हत्या २००२ मध्ये करण्यात आली होती. बेनामी पत्र प्रसिद्ध करण्यासाठी मदत करण्यासाठी त्याची हत्या करण्यात आली होती.