मुंबई : मोहनदास करमचंद गांधी, अर्थात आपल्या सर्वांच्या परिचयात असणारे महात्मा गांधी. 'राष्ट्रपिता' म्हणून त्यांची साऱ्या देशाला ओळख. अहिंसेच्या मार्गावर जीवनाचा प्रवास करणारे हेच 'बापू'. नावाप्रमाणेच महात्मा यांचा जीवनप्रवास अनेकांना आकर्षून घेणारा. (mahatma gandhi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्याग्रह असो किंवा मग अहिंसा आंदोलनाची हाक. गांधीजी आणि त्यांची तत्त्वं कायमच समाजापुढे आदर्श प्रस्थापित करत गेली. त्यांच्या या प्रवासामध्ये महत्त्वाची साथ निभावली ती म्हणजे अर्धांगिनी कस्तुरबा गांधी यांनी. 


तुम्हाला माहितीये का, सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणेच कस्तुरबा आणि महात्मा गांधी यांच्या नात्यातही काही मतभेद असायचे. काही पुस्तकांमध्ये याचा स्पष्ट उल्लेखही आहे. 


मुख्य मुद्दा असा, की मतभेद असतानाही  महात्मा त्यांच्या पत्नीशी असणारा संवाद तितकाच पारदर्शक आणि स्पष्ट ठेवत होते.


हेच उदाहरण सांगणारा एक रंजक आणि डोळ्यात पाणी आणणारा किस्सा. जेव्हा सून तिच्या मुलांसोबत साबरमती आश्रमातून राजकोटला गेली तेव्हा कस्तुरबा यांना फार एकटं वाटू लागलं. 


नाडियाड येथे गांधीजींसोबत सत्याग्रहाच्या ठिकाणी जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तेव्हाच 'बापूं'नी त्यांच्यासाठी हे पत्र लिहिलं... 


'बा... 
फक्त 9 दिवस राहिले आहेत. देवाच्या मनात असेल तर आपली भेट नक्की होईल. मी तुझ्या पत्रात एका प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरलो होतो. घरातून येताना मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला नाही, असं तू म्हटलं होतंस. 


जशी गाडी सुरु झाली, तेव्हा मी असं करायला हवं होतं असं मलाही वाटलं. पण, तू दूर उभी होतीस. तुला खरंच अशा औपचारिकतेची गरज वाटते का? 


मी औपचारिकतेतून माझं प्रेम व्यक्त करत नाही, असं तुला का वाटतं? हे प्रेम संपलंय का? 


मी तुला मोठ्या विश्वासानं सांगतो, की तुझ्याप्रती माझं प्रेम दिवसागणिक वाढत चाललं आहे. असं नाही की हे प्रेम आधी कमी होतं... 


पण, आधीपेक्षाही हे प्रेम आता अधिक पवित्र आणि व्यापक होत चाललं आहे. मी तुला आता फक्त एका पत्नीच्या नजरेतून पाहत नाही. 


मी आणखी काय बोलू... तुला अजुनही वाटत असेल की, तुला औपचारिक संकेत हवेसे आहेत, तर मी तसंही करत जाईन.... 
... बापू.'


पती आणि पत्नीच्या नात्यात अनेकदा असे टप्पे येतात जेव्हा पतीकडून प्रेम व्यक्तच केलं जात नाही, असाच तक्रारीचा सूर पत्नी अनेकदा आळवत असते.


पण, अनेकदा हक्काच्या माणसांना सारखं औपचारिक वागणूक देण्याची गरज नसते, हीसुद्धा त्यामागची एक भावना असते. यात त्या औपचारिकतेपेक्षा हक्काचं माणूस असणं हेच जास्त महत्त्वाचं. नाही का?