मुंबई : आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तुम्हालाही आपलं हक्काचं घर खरेदी करायचं आहे? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाची सुविधा आणखीन सुलभ केली आहे. त्यामुळे आता ३५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज प्राथमिक क्षेत्रातील कर्जाच्या श्रेणीत समावेश केलं आहे. ही सुविधा ४५ लाख रुपयंपर्यंतचं घर खरेदी करणाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. बँकांकडून मिळणारं प्राथमिक क्षेत्रातील कर्ज हे इतर कर्जांच्या तुलनेत खूपच स्वस्त असतं. यामुळे आता ज्यांचं वार्षिक उत्पन्न दोन ते सहा लाख रुपये आहे असे नागरिकही आपलं घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेत म्हटलं आहे की, आर्थिक रुपात कमकुवत आणि मध्यम उत्पन्न असलेल्या वर्गासाठी स्वस्त गृह कर्ज उपलब्ध करण्यासाठी प्राथमिक क्षेत्रातील कर्जाच्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे प्राथमिक क्षेत्रातील कर्जात गृह कर्जाची पात्रता महानगरांत ३५ लाख रुपये आणि इतर शहरांसाठी २५ लाख रुपये केली आहे.


काय आहे अट?


यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे की, दहा लाख आणि त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अशा घराची किंमत ४५ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावी. तर, इतर शहरांत स्वस्त गृह कर्जाच्या योजनेच्या घरांचे दर ३० लाख रुपयांपेक्षा अधिक नसावं. असे असल्यास त्यांना प्राथमिक क्षेत्रातील कर्जाची सुविधा उपलब्ध होईल.


सध्याच्या स्थितीत हे कर्ज महानगरांत ३५ लाख रुपये आणि इतर शहरांत २५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांना प्राथमिक क्षेत्रातील कर्जाच्या यादीत ठेवलं होतं. तसेच यासाठी क्रमश: २८ लाख रुपये आणि २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं.