रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात पाव टक्का कपात?
भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे. या आढव्यात व्याजाच्या दरात पाव टक्का कपात होईल अशी अपेक्षा आहे.
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे. या आढव्यात व्याजाच्या दरात पाव टक्का कपात होईल अशी अपेक्षा आहे.
गेल्या सहा महिन्यात महागाई वाढण्याच्या भीतीनं रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. पण आता परिस्थिती बदललीय.. महागाईच्या दरानं गेल्या अनेक वर्षातला नीचांक गाठलाय. त्याबरोबर उद्योगांच्या वाढीचा दरही कमालीचा घटलाय.
एकूणच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्वस्त भांडवलाची गरज आहे. त्यामुळे व्याजाच्या दरातली कपात क्रमप्राप्त बनलीय. दरम्यान आज होणारी कपात गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेणाऱ्या सामान्य कर्जदारांना कितपत फायदेशीर ठरेल याबाबत साशंकता आहे.
गृहकर्जाची व्याजाचे दर सद्यस्थितीत अत्यंत खाली गेलेले आहेत. सध्याच्या पातळीवरून गृह किंवा वाहनकर्जाच्या व्याजाचे दर आणखी खाली आणणं बँकांना व्यावसायिक दृष्टीनं फारसं श्रेयस्कर होणार नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं व्याजाच्या दरात कपात केलीच, तरी त्याचा फायदा उद्योगांना मिळणाऱ्या कर्जाला होईल.भांडवल स्वस्त करून खासगी गुंतवणूकीला चालना देणे हाच या व्याजदर कपातीमागचा उद्देश असणार आहे.