मुंबई : पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (PMC) रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आहेत. त्यामुळे खातेदारांना बँकेतून केवळ हजार रूपयेच काढता येणार आहेत. तसेच बँक मुदत ठेव स्वीकारू शकत नाही. बँकेला कर्जवाटप करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. बँकेचे खातेदार आता हवालदिल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेच्या खातेदारांना आज सकाळी बँकेतून बँकेचे व्यवहार ठप्प झाले असल्यासंदर्भात मेसेज आला. त्यानंतर या बँकेच्या विविध शाखांमध्ये खातेदारांनी एकच गर्दी केली. पण कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास बँकेचे कर्मचारी असमर्थ ठरल्यामुळे खातेदारांमध्ये असंतोष आहे. या बँकेच्या मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर १३७ शाखा आहेत. राज्यात बँकेचे हजारो खातेदार आहेत.  


पीएमसी बँकेवर निर्बंध आल्यावर विविध शहरात असंतोष उफाळून आला आहे. बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. १ हजार रूपयेच काढण्याची मुभा असल्याने खातेदारांत संतापाचे वातावरण आहे. 


खोपोलीत बँकेत ठेवीदारांनी गर्दी केली आहे. ठेवीदारांनी बँकेबाहेर गोंधळ घातला. तर ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्येही ठेवीदारांनी बँकेत गोंधळ घातला. अचानक व्यवहार बंद झाल्याने ठेवीदारांमध्ये भिती पसरली आहे.


पीएमसी बँकेचे निवेदन


रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी पीएमसी बँकेवर निर्बंध लागू केलेत हे सांगताना आम्हाला दु:ख होतं. अनियमितता आढळल्याने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र पुढील सहा महिन्यांच्या आत हे सर्व निर्बंध दूर होतील याबाबत आम्ही खातेदार, गुंतवणुकदारांना आश्वस्त करतो. यासाठी बँकेचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन करतो.