आरबीआय आणतेय 20 रुपयांचे नाणे, जाणून घ्या खास गोष्टी
सरकारने बुधवारी 20 रुपयांचे नवे नाणे जारी करण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : सरकारने बुधवारी 20 रुपयांचे नवे नाणे जारी करण्याची घोषणा केली आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील नोटीफिकेशन जारी केले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दृष्टीहीनांस अनुकूल असणाऱ्या 1,2,10 आणि 20 रुपयांच्या नव्या नाण्यांचे अनावरण करण्यात आले. ही नाणी दृष्टीहीनांना हाताळण्यास सोपी असणार आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हे अनावरण झाले. यातील 20 रुपयांच्या नाण्याची बरीच चर्चा आहे.20 रुपयाचे नाणे 27 एमएम आकाराचे असणार आहे. दरम्यान 20 रुपयांच्या नाण्यावर कोणते निशाण नसणार आहे. नाण्याच्या बाह्य वर्तुळात 65 टक्के कॉपर, 15 टक्के झिंक आणि 20 टक्के कथिल असणार आहे. आतील भागात 75 टक्के कॉपर, 20 टक्के झिंक आणि 5 टक्के कथिल असणार आहे.
नाण्याच्या दर्शनी भागावर अशोक स्तंभाचे निशाण दिसेल आणि त्याखाली 'सत्यमेव जयते' लिहिले असले. उजव्या बाजूला 'भारत' आणि डाव्या बाजूला 'INDIA' असे छापलेले असेल. यावर रुपयाचे चिन्ह असेल. याशिवाय शेतीचे निशाणही असणार आहे.
10 वर्षांनंतर जारी
10 वर्षांआधी मार्च 2009 मध्ये रिझर्व बॅंक ऑफ इंडिया (RBI) ने 10 रुपयांचे नाणे जारी केले होते. तेव्हा पासून आतापर्यंत 13 वेळा नाण्याची डिझाइन बदलली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नेहमी संभ्रम असतो. काही दुकानदार कधीकधी नव्या नाण्याचे खोटे समजून स्वीकारण्यास नकार देतात असे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्यावर्षी आरबीआयने एक नोटीफिकेशन जारी केले होते. यामध्ये 14 प्रकारच्या नाण्यांची वैधता म्हणजेच लीगल टेंडर सुरू ठेवण्याचे सांगितले होते. नोटांच्या तुलनेत नाण्यांचा टीकाव जास्त असतो. ते जास्त काळ चलनात राहतात.