नवऱ्याला सोडेन पण मशेरी नाही! घटस्फोटापर्यंत पोहचलं प्रकरण; पती म्हणतो, `लग्नाआधी..`
Divorce Over Consuming Tobacco: या दोघांचं 8 महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. मात्र लग्न करताना पत्नीला हे व्यसन आहे याची कल्पना नव्हती. त्याने अनेकदा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावरुन दोघांची बरीच भांडणंही झाली.
Divorce Over Consuming Tobacco: तंबाखूचं सर्वाधिक सेवन करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. भारतामधील ग्रामीण भागात तंबाखू खाणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. त्याही महिला तंबाखूपासून तयार केलेल्या मशेरीनेच आपल्या दिवसाची सुरुवात करताना दिसतात. बऱ्याच ग्रामीण महिलांना मशेरीचं व्यसन असतं. मात्र हे व्यसन लग्न मोडू शकतं असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. पण खरंच असा प्रकार उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे घडला आहे. मशेरीसाठी एका महिलेने चक्क पतीला घटस्फोट देण्याची तयारी दर्शवली आहे.
नक्की कुठे घडला हा प्रकार?
आग्रा येथील या दांपत्याच्या वादाचं कारण मशेरी आहे असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पत्नी मशेरीचं सेवन करते म्हणून पती-पत्नीमध्ये सातत्यानं खटके उडतात. पत्नी काहीही झालं तरी मशेरी सोडण्यास तयार नाही. ही महिला दिवसातूनव 3 ते 4 वेळा मशेरी लावते. पत्नीच्या या मशेरी प्रेमाला पती अगदी कंटाळला आहे. मात्र या समुपदेशनाने प्रकरण निस्तरण्याऐवजी अधिक चिघळलं.
पतीला सोडायला तयार पण मशेरी सोडणार नाही
आपली भूमिका मांडताना, मी माझ्या पतीला सोडायला तयार आहे पण मशेरी सोडणार नाही, असं ही महिला म्हणाली. पतीने केलेल्या दाव्यानुसार, पत्नी दिवसातून 3 ते 4 वेळा मशेरी लावते. मशेरी लावल्यानंतर पत्नी घरभर इकडे तिकडे फिरत असते. यावरुनच या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि पतीने पत्नीला घराबाहेर काढलं. मागील 2 महिन्यांपासून मशेरीवरील प्रेमापोटी ही महिला पतीला सोडून आपल्या माहेरी राहत आहे. पती-पत्नीमध्ये मशेरीवरुन झालेला हा वाद घरच्यांना सोडवता आला नाही आणि तो थेट कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत जाऊन पोहोचला.
माहेरी राहू लागली महिला
आग्रा येथील मंटोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सदर पतीने आपल्या पतीविरोधात थेट पोलिसांत धाव घेतली आहे. 8 महिन्यांपूर्वीच आपलं लग्न फतेहपूर सिक्रीतील या तरुणीशी झालं. लग्नाआधीपासून ती मशेरी लावायची याची कल्पना नव्हती. तिला मशेरीचं व्यसन असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं नव्हतं असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. आता या मशेरीमुळेच त्यांच्या घरात अनेकदा वाद होतात. मशेरीवरील वादातून पत्नी माहेरी गेली असून अनेकदा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असूनही ती फोन उचलत नसल्याचं या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
लग्नानंतर व्यसनाबद्दल समजलं
लग्नानंतर पतीला पत्नीच्या मशेरीच्या व्यसनासंदर्भात समजलं. अनेकदा त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी मशेरी न सोडण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम होती. हे प्रकरण पोलिसांमध्ये गेल्यानंतर त्यांनी ते समुपदेशन केंद्राकडे वर्ग केलं. या महिलेला तंबाखू सेवनाचे तोटे समजावून सांगण्यात आले. तंबाखूपासून बनवलेली मशेरीही आरोग्यासाठी धोकादायक असते असं तिला सांगण्यात आलं. यामुळे जीवघेणे आजार होऊ शकतात याची कल्पनाही तिला देण्यात आली. मात्र महिलेने मशेरी सोडणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तिच्या या भूमिकेमुळे केंद्रातील समुपदेशकही थक्क झाले आहेत. सध्या या केंद्राचे प्रभारी असलेल्या अपूर्व चौधरींनी पुढली तारीख देऊन दोघांना भेटीसाठी बोलावलं आहे.