...म्हणून राहुल गांधी दोन ठिकाणी निवडणूक लढणार
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघाची निवड राहुल गांधींनी केली आहे. एक से भले दो... असं म्हणतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यंदाची लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी या परंपरागत मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेतच, पण यावेळी केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही राहुल गांधी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.
२००४ पासून राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २०१४ मध्ये भाजपाच्या स्मृती इराणींनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी कमी फरकानं राहुल गांधींचा विजय झाला होता. मात्र केंद्रीय मंत्री झाल्यानंतर स्मृती इराणींनी अमेठीत अनेक योजना राबवल्या. आता पुन्हा एकदा त्यांनी अमेठीतून राहुल गांधींना आव्हान दिलं आहे. त्यामुळेच संभ्रमावस्थेत सापडलेल्या राहुल गांधींनी केरळच्या वायनाडकडे आपला मोर्चा वळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केरळमधील वायनाड हाच मतदारसंघ निवडण्याची अनेक कारणं आहेत. वायनाड लोकसभा मतदारसंघात तमिळ, केरळी, कन्नड मतदारांचं प्राबल्य आहे. तिथे मुस्लिम, ख्रिश्चन मतदारांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत २००९ आणि २०१४ मध्ये तिथून काँग्रेसचे शनावास हे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलेत. दक्षिण भारतात काँग्रेसची पकड मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे.
याआधी १९९९ मध्ये सोनिया गांधींनीही दक्षिणेच्या बेल्लारीमधून सुषमा स्वराज यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्या जिंकल्या देखील होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गेल्यावेळी वडोदरा आणि वाराणसी अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळेच राहुल गांधींनी अमेठीसोबत वायनाडची निवड केल्याचं सांगितलं जातं आहे.