Ambani-Adani Out Of Race: `ही` कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीतून अंबानी-अदानी बाहेर; 6 कंपन्यांमध्ये चुरस कायम
Ambani-Adani Out Of Race: मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये पहिल्यांदा कंपनीने लिलाव करण्यासंदर्भातील प्रयत्न केला होता. मात्र ही प्रयत्न फसल्यानंतर आता पुन्हा कंपनीने लिलावासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे.
Ambani Adani Out Of Future Retail Race: किशोर बियानी यांच्या नेतृत्वाखालील फ्यूचर रिटेल (Future Retail) लिमिटेड कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. या कंपनीच्या विक्रीसंदर्भातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गोतम अदानी हे दोन्ही उद्योजक ही कंपनी विकत घेण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा उद्योग जगतामध्ये होती. ही प्रसिद्ध कंपनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही उद्योजकांना रस होता. मात्र आता या दोघांनाही या व्यवहारात न पडण्याचा निर्णय घेतला आहे. 'बिग बाजार'ची मातृक कंपनी असलेल्या या कंपनीवर मोठं कर्ज असून लिलावासाठी कंपनीने दुसऱ्यांदा गुंतवणूकदारांसमोर ऑफर ठेवली आहे.
अंबनी-अदानी पडले बाहेर
खरं तर 2022 साली एप्रिल महिन्यामध्ये फ्यूचर रिलेट कंपनीने पहिल्यांदा गुंतवणूकदारांचा शोध सुरु केला. केवळ अंबानी आणि अदानी नाही तर तब्बल 49 मोठ्या कंपन्यांनी 'बिग बाजार'सारखा मोठा रिलेट ब्रॅण्ड या कंपनीच्या मालकीचा आहे ती विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र आता ही कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीमधून अदानी आणि रिलायन्स ग्रुप बाहेर पडल्याचं वृत्त 'इकनॉमिक टाइम्स'ने दिलं आहे. विशेष म्हणजे 49 पैकी 40 हून अधिक कंपन्यांनी माघार घेतली आहे. लिलावाच्या अंतिम फेरीमध्ये केवळ 6 कंपन्यांमध्ये या कंपनीसाठी चढाओढ असेल असं वृत्त आहे.
या 6 कंपन्या शर्यतीत
फ्यूचर रिलेटला विकत घेण्यासाठी ज्या कंपन्या अजूनही इच्छूक आहेत त्यामध्ये स्पेस मंत्रा, पलगुन टेक एलएलसी, गुडवील फर्नीचर, पिनेकल एअर, लहर सोल्यूशन्स, सर्वभिष्ट ई-वेस्ट मॅनेजमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. फ्यूचर रिलेटसाठी सर्वाधिक बोली ही स्पेस मंत्राने लावली आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल कंपनी लॉ ट्रेब्युलंटने फ्यूचर ग्रुपला दिवाळखोरीवर उपाय शोधण्यासाठी 90 दिवस म्हणजेच 3 महिन्यांचा वेळ दिला आहे. कंपनीचं 21,000 कोटींचं देयक थकित आहे.
मागील वर्षी झाली असती डील पण...
काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये बिग बाझारची रिटेल स्टोअर चांगलीच लोकप्रिय होती. मात्र हळूहळू या कंपनीला उतरती कळा लागली. यापूर्वीही कंपनीने भांडवल गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी कंपनीला फारसं यश आलं नाही. त्यानंतर कंपनीने आता नव्याने लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मागील वर्षी फ्यूचर रिटेल आणि मुकेस अंबानींच्या रिलायन्स रिलेटमध्ये व्यवहार जवळजवळ निश्चित झाला होता. मात्र अॅमेझॉनने विरोध केल्यानंतर हा व्यवहार पुढे जाऊ शकला नाही आणि रिलायन्सने या व्यवहारातून काढता पाय घेतला.