पाकिस्तान घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत प्रत्युत्तर - राजनाथ सिंह
पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत राहील
लेह/ श्रीनगर : पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत राहील, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही, भारतीय लष्कर पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करील, असा इशारा दिला.
भारताने कधीही प्रथम गोळीबार केला नाही. असतानाही पाकिस्तान आगळीक करीत असून त्याला भारतीय लष्कर सडेतोड जबाब देत आहे, असेही राजनाथ म्हणाले.
पूर्व लडाखमधील श्योक नदीवर बांधलेल्या कर्नल चेवांग रिनचेन पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. श्योक नदीवर बांधलेल्या पुलाची उंची सुमारे १४०० फूट इतकी आहे. पुलाचे काही फोटो त्यांनी स्वत:च्या ट्विटर आकाउंटवरून शेअर केले आहेत.
भारतीय सैन्यदलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये भारतीय सैन्यदलाकडून अनेक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी शनिवारी दिली.