नवी दिल्ली: राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) रोजगारासंदर्भातील अहवालाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे देशातील बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षातील उच्चांक गाठला आहे किंवा नाही, याची अद्याप पुष्टी झालेली नाही, असे स्पष्टीकरण नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिले. ते गुरुवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 'एनएसएसओ'च्या अहवालातील गुप्त माहिती गुरुवारी विरोधकांच्या हाती लागली. या माहितीनुसार, देशातील बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षातील उच्चांक गाठला आहे. जुलै २०१७ ते जून २०१८ या काळात झालेल्या या सर्वेक्षणानुसार बेरोजगारीचा दर ६.१ टक्के इतका नोंदवण्यात आला. १९७२-७३ पहिल्यांदाच बेरोजगारीचा दर इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे 'एनएसएसओ'च्या अहवालात नमूद करण्यात आले होते. या माहितीच्या आधारे आज सकाळपासूनच विरोधकांनी सरकारला घेरले होते. त्यामुळे केंद्र सरकारची चांगलीच कोंडी झाली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचे दावे फेटाळून लावले. विरोधकांकडून प्रमाण मानला जाणारा 'एनएसएसओ'चा अहवाल अद्याप तयारच झालेला नाही. या अहवालाचा केवळ कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय, पूर्वीच्या तुलनेत सर्वेक्षणाचासाठी माहिती गोळा करण्याची पद्धतही बदललेली आहे. आता संगणकावरून लोकांची मुलाखत घेतली जाते. ही सगळी माहिती अजूनही छाननी प्रक्रियेत आहे. हे काम पूर्ण होईल तेव्हा आम्ही अहवाल प्रसिद्ध करू. मात्र, त्यापूर्वी दोन वेगवेगळ्या पद्धतींची तुलना करणे योग्य ठरणार नाही. हा अहवाल मार्चनंतर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच देशात रोजगारच उपलब्ध नसतील तर अर्थव्यवस्थेचा विकासदर ७ टक्के कसा असू शकतो, असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला. 


तत्पूर्वी अहवालातील फुटलेल्या माहितीने विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला. सरकारने प्रत्येकवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पाच वर्षांनंतरची परिस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणावी लागेल. बेरोजगारीने ४५ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. ट्विटरवरील या संदेशात राहुल यांनी NoMo Jobs, #HowsTheJobs हे टॅग वापरून मोदी सरकारची खिल्ली उडविली आहे. राहुल गांधींच्या या ट्विटनंतर ट्विटरवर #HowsTheJobs हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता.