कर्नाटककडून मराठी भाषिकांवर दडपशाही
कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांची पुन्हा गळचेपी करण्यात आली आहे.
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांची पुन्हा गळचेपी करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे. कुद्रेमनी या मराठी भाषकांच्या गावात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाला मध्यरात्री पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काही अटींवर परवानगी दिली. त्यामुळे कडेकोट पोलिस बंदोबस्तात याठिकाणी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.
तर दुसरीकडे खानापूर मधल्या ईदलहोंड या गावातील साहित्य संमेलनावर मात्र कर्नाटक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. या संमेलनाला महाराष्ट्रातून श्रीपाल सबनीस, सुनंदा शेळके हे साहित्यिक जाणार होते. पण त्यांच्या येण्यावर कर्नाटक पोलिसांनी अटक करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, खानापूरमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साहित्यिक बेळगावमध्येच आहेत. दरम्यान कर्नाटक प्रशासनाचा निषेध म्हणून मराठी साहित्यिक बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.