मुंबई : भावना व्यक्त करण्याचं एक सुरेख माध्यम म्हणजे गाणं. गाण्यात असणारे शब्द, त्याचे सूर आणि अर्थातच ते सादर करणाऱ्या व्यक्तीची समर्पकता या सर्व गोष्टी त्या गाण्याला आणखी प्रभावी करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभक्तीपर गीतांचं म्हणावं तर, अशा गाण्यांमधून देशप्रेमासोबतच कमालीचा अभिमान आणि आपुलकीची भावना झळकत असते. असंच एक देशभक्तीपर गीत एका जवावानं नुकतंच सादर केलं होतं.



(व्हिडीओ सौजन्य- Vikram jeet Singh rising star/ You Tube)


प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जिथे अनेक ठिकाणी देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे शब्द कानी पडत होते, तिथेच या गाण्याचा व्हिडीओ समोर आला. 


लष्करी पोषाखामध्ये मनापासून भारतमातेला साद घालणारा एक चेहरा या व्हिडीओत पाहता आला. 


हा चेहरा आहे, विक्रमजीत सिंग यांचा. देशाची सेवा करण्यासोबतच हा वीर सुपूत्र त्याची गाण्याची आवडही तितक्याच आत्मियतेने जपताना दिसतो. 


विक्रमजीत यांनी देशाप्रतीच्या सर्व भावना एकवटत 'तेरी मिट्टी मे मिल जावां' हे गाणं सादर केलं.


हे गाणं ऐकत असताना, प्राण गेले तरी बेहत्तर पण हे भारतमाते.... तुझ्याच सेवेत आम्ही तत्पर असू आणि आमचं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठीच वेचत राहू अशाच सुरेख भावना ते व्यक्त करत असल्याचं दिसून येतं. 


मोठमोठ्या बाता करणारे आपण हे गाणं ऐकताना विक्रमजीत सिंग यांच्यापुढे अगदी इवलेसे होऊन जातो. 


'महफूज रहे तेरी आन सदा 


चाहे जान ये मेरी रहे न रहे', या ओळी गाताना देशाची मान कायम उंचावत रहावी यासाठी त्यांच्या आवाजात आलेला गंभीरपणाही तितक्याच प्रकर्षाने जाणवतो. 


'केसरी' या चित्रपटातील या गीतानं अनेकांना पाझर फोडला. पण, या जवानानं त्याच्या अंदाजात भारतमातेसाठी सादर केलेलं हे गाणं नव्यानं काळजाता ठाव घेतंय आणि नकळत आपल्याला या भारतभूमीसमोर नतमस्तक व्हायला लावतंय.