जम्मू-काश्मीर : अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मूमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी उठवण्यात आली आहे. राज्यातील सुरक्षाव्यवस्था नियंत्रणात असल्याचे अतिरिक्त महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले. जम्मूमधील जनजीवन पूर्ववत असून शाळा आणि कार्यालये सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. तर काश्मीरमध्ये मात्र, काही ठिकाणी अजूनही संचारबंदी अजूनही लागू आहे.  ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आल्याचं मुनीर खान यांनी स्पष्ट केले आहे.




मुंबईत हाय अलर्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबईत १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत जागोजागी नाकाबंदी करण्यात येतेय. विशेषत: रेल्वे पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली असून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मुंबई आणि देशातल्या महत्त्वाच्या शहरात हायअलर्ट जारी केला होता. 


जैश-ए-मोहम्मद ही अतिरेकी संघटना मोठा कट रचत असून त्यासाठी आयएसआय संघटना मदत करत असल्याचं या हायअलर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार - राहुल


जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्यावर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक चांगलेच भडकलेत. राहुल गांधींसाठी विमान पाठवतो त्यांनी काश्मीरच्या खोऱ्यात यावे आणि इथली परिस्थिती पाहून मगच बोलावं असं आव्हान सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना दिले आहे. 


राहुल गांधींनी शनिवारी काश्मीर खोऱ्यात हिंसाचार सुरू असल्याचं अहवालाचा हवाला देत म्हटलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत असल्याची टीकाही केली होती. राहुल गांधी यांच्या विधानावर जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक मात्र भडकले. आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा ट्विट करुन सत्यपाल मलिकांवर टीका केली.