दिवाळीआधी बोनस मिळाल्याने रिक्षाचालक आनंदात
रिक्षा चालकांनी बचतीच्या माध्यमातून यंदा एक लाख ९ हजारापर्यंत बोनस घेतला आहे.
बदलापूर : बदलापूरच्या रिक्षाचालकांची दिवाळी यंदा आनंदात जाणार आहे. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्याप्रमाणे आता या रिक्षाचालकांनाही बोनस मिळणार आहे.
दिवाळीच्या तोंडावर सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसच्या आकड्यांनी आनंदाचे वातावरण असते. मात्र त्याचवेळी खाजगी आणि व्यवसाय करणाऱ्यांना बोनस म्हणजे दुरापास्तच म्हणावे लागेल. पण बदलापूरातील रिक्षाचालक याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी बचतीच्या माध्यमातून यंदा एक लाख ९ हजारापर्यंत बोनस घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या घरी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली जाणार आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या या बोनस योजनेने यंदा २५ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे बदलापूरातील रिक्षाचालक सरकारी अधिकाऱ्यांना भारी पडल्याची चर्चा शहरात होती. वर्षभर केवळ रिक्षा चालवून त्याच्यावर उदरनिर्वाह करणा-या रिक्षा चालकांनाही बोनस दिल्यास त्यांचीही दिवाळी इतरांप्रमाणे साजरी व्हावी यासाठी बदलापूरच्या पूर्व भागातीलरिक्षा चालक-मालक संघटनेने रिक्षा चालकांना दैनदिन बचतीची सवय लावली.
दिवाळीआधी रक्कम मिळते
२००३ पासून हा उपक्रम सुरु आहे. चालकांची जमा झालेली ही रक्कम दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाते. रिक्षा चालक भारती पाटिल यांनी देखील बचत करून ६५०० रुपयांचा बोनस मिळवला आहे.