पटना : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचं जागावाटप निश्चित झालं आहे. आरजेडी 144, काँग्रेस 70 आणि लेफ्ट 29 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आरजेडी आपल्या कोट्यातून व्हीआयपी पक्षाला काही जागा देईल. आरजेडी, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (माले), सीपीएम आणि व्हीआयपी महाआघाडीतील पक्ष आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते अविनाश पटदे यांनी म्हटले की, काही मतभेद दूर झाल्यानंतर आरजेडी, काँग्रेस, व्हीआयपी आणि लेफ्ट यांची महाआघाडी झाली आहे. 2015 मध्ये महाआघाडीला जनतेचं समर्थन मिळालं होतं. पण त्या बहुमताचं अपहरण झालं. नीतीश कुमार यांना दगा दिला आणि भाजपसोबत सत्तेत गेले. जनता त्यांना माफ करणार नाही. महाआघाडीचं नेतृत्व तेजस्वी यादव करतील.



आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, 'जर बिहारची जनता त्यांना संधी देईल तर ते त्यांच्या मान-सन्मानाची रक्षा करतील. आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो. माझा डीएनए देखील शुद्ध आहे.'


2015 च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडी 101, जेडीयू 101 आणि काँग्रेस 41 जागांवर लढली होती. जेडीयू तेव्हा महाआघाडीमध्ये होती. पण नंतर जेडीयूने भाजपसोबत हातमिळवणी केली आणि NDA चा महत्त्वाचा मित्र पक्ष बनली. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए बिहार निवडणूक लढवणार आहे.


2015 च्या विधानसभा निवडणुकीत 243 पैकी महाआघाडीला 178 जागा मिळाल्या होत्या. नीतीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनले होते. पण 2 वर्षानंतर जेडीयू महाआघाडीमधून बाहेर पडली. भाजप सोबत सत्ता स्थापन केली.


बिहारमध्ये एकूण 3 टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला होणार असून त्यानंतर 3 नोव्हेंबर आणि मग 7 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.