रांची : बहुचर्चित चारा घोटाळ्यात झारखंडच्या दोरांडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची इथल्या विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालू प्रसाद यादव यांच्यासह 75 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून 24 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांना २१ फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.


सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राजेंद्र पांडे, साकेत लाल, दीनानाथ सहाय, राम सेवक साहू, ऐनुल हक, सनौल हक, अनिल कुमार यांची दोरांडा प्रकरणात पुराव्याच्या आधारे निर्दोष मुक्तता केली आहे. 


सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अशोक कुमार यादव यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. श्यामानंदन सिंग यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना 75,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. नंद किशोर प्रसाद यांनाही 3 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 3 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा असलेल्या आरोपींना जामीनपत्र भरण्याची तयारी करण्यास सांगण्यात आलं आहे.


चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या प्रकरणात रांची इथल्या विशेष CBI न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्यासह सर्व 99 आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं.


१३९ कोटी घोटाळ्यात दोषी
लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यासंबंधीत पाच प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं होतं. याआधी चार प्रकरणांमध्ये निकाल देण्यात आला असून या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. आता पाचव्या खटल्यातही लालू यादव दोषी आढळले आहेत. हे प्रकरण रांचीच्या दोरंडा येथील ट्रेझरीमधून 139.5 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याशी संबंधित आहे.


1996 मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात सुरुवातीला 170 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. यातील ५५ आरोपींचा मृत्यू झाला आहे, तर सात आरोपींना सीबीआयने सरकारी साक्षीदार बनवलं आहे. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला. आतापर्यंत ६ आरोपी फरार आहेत.


याआधी लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणात एकूण साडेसत्तावीस वर्षांची शिक्षा झाली होती, तर त्यांना एक कोटी रुपयांचा दंडही भरावा लागला होता. या प्रकरणांमध्ये झालेल्या शिक्षेमुळे आरजेडी सुप्रिमोला अर्धा डझनहून अधिक वेळा तुरुंगात जावे लागले.