एनडी तिवारींच्या मुलाची तोंड दाबून हत्या; शवविच्छेदन अहवालात खुलासा
१६ एप्रिल रोजी रोहित शेखर तिवारी याचा गूढरित्या मृत्यू झाला होता.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत राजकीय नेते नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित याच्या मृत्यू प्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोहित शेखर तिवारी याची हत्या झाल्याची शक्यता आणखी बळावली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असतानाच आता रोहितचा शवविच्छेदन अहवालही प्रसिद्ध झालाय. यामध्ये रोहितचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची तोंड दाबून हत्या करण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला रोहितचा मृत्यू मेंदुतील रक्तस्त्रावामुळे (ब्रेन हॅमरेज) झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे.
शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रोहित राहत असलेल्या दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील घराची झडती घेतली. या पथकात फॉरेन्सिक तज्ज्ञांचाही समावेश होता. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलण्यास पोलिसांनी नकार दिला. कोणताही ठोस पुरावा हाती लागेपर्यंत काहीही सांगण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली. मात्र, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
१६ एप्रिल रोजी रोहित शेखर तिवारी याचा गूढरित्या मृत्यू झाला होता. रोहितच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नव्हत्या. रोहितला घरातील नोकरांनी सर्वप्रथम मृतावस्थेत पाहिले होते. त्यावेळी रोहितच्या नाकातून रक्त बाहेर आले होते. त्यामुळे सुरुवातीला रोहितचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचे सांगण्यात येत होते. रोहितची आई उज्ज्वला तिवारी यांनी मात्र रोहितचा मृत्यू सामान्य असल्याचा दावा केला आहे.