हरिद्वार : पुढील 15 वर्षात अखंड हिंदुस्तान होईल आणि आपल्या सर्वंना तो पहायला मिळेल असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपण अहिंसेबद्दल बोलू, पण हातात दंडूका घेऊन बोलू. आपल्या मनात कसलाही द्वेष किंवा वैर नाही, पण जग शक्तीला मानत असेल तर काय करणार? असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संत आणि ज्योतिषांच्या मते 20 ते 25 वर्षात भारत अखंड राष्ट्र होईल, पण आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर 10 ते 15 वर्षातच भारत अखंड राष्ट्र होईल असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 


सनातन धर्माला विरोध करणाऱ्या तथाकथित लोकांचंही यात सहकार्य आहे, त्यांनी विरोध केला नसता तर हिंदू जागा झाला नसता, भारताचा उदय झाला तर तो धर्मानेच होईल, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. धर्माच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले तरच भारताचा उदय होईल. भारत वेगाने प्रगती करत आहे. त्यामध्ये कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर तो संपेल असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 


हरिद्वारमधल्या एका कार्यक्रमात संतांनी संघप्रमुखांसमोर देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी लावून धरली. कनखलच्या सन्यास रोडवरील श्रीकृष्ण निवास अर्थात पूर्णानंद आश्रमामधील ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री 1008 स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि श्री गुरुत्रय मंदिराचे लोकार्पण मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 


संजय राऊत यांची प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अखंड भारताच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करतो. 2014, 2019 मध्ये भाजपाने याच मुद्द्यावर मतं मागितली. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करा. तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही. पण त्याआधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. कारण अखंड हिंदुस्थान त्यांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. तुम्ही सावरकर आणि बाळासाहेब यांचे आभार माना कारण त्यांनी ही संकल्पना रुजवली,' असं संजय राऊत म्हणाले.


'अखंड हिंदुस्थान करण्याआधी काश्मिरी पंडितांची घऱवापसी सन्मानाने करा. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.