कोची: केरळमध्ये सध्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून निर्माण झालेला वाद चांगलाच पेटला आहे. यापूर्वी मंदिरात १० ते ५० वयोगटाच्या महिलांना प्रवेश निषिद्ध होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही प्रथा रद्द करत सर्व वयोगटाच्या महिलांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर शबरीमाला मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला भक्तांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रोखले होते. एवढेच नव्हे तर शबरीमाला मंदिराच्या परिसरात बंदोबस्तावर असणाऱ्या महिला पोलिसांच्या वयाची संघाच्या नेत्यांकडून खातरजमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 


केरळमधील संघाचे ज्येष्ठ नेते वलसन थिल्लनकेरी यांनी कोझिकोडे येथील जाहीर सभेत याबद्दल सांगितले. शबरीमाला परिसरात १५ महिला पोलीस तैनात आहेत. आम्ही या सर्वांच्या जन्माचा दाखलाही तपासून बघितले. त्यांचे वय ५० पेक्षा जास्त असल्याचे थिल्लनकेरी यांनी म्हटले. 


केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंदिराच्या परिसरात तरुण महिला पोलीस कर्मचारी तैनात केल्याचा दावा थिल्लनकेरी यांना फेटाळून लावला. मुख्यमंत्र्यांनी मंदिराच्या परिसरात ५० तरुण महिला कर्मचारी तैनात करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, कोणीही येथे यायला तयार नाही. हिंदू संघटना मनात आणले तर काय करु शकतात, याचा हा उत्तम नमूना असल्याचेही थिल्लनकेरी यांनी सांगितले.