`भारताने प्रगती करु नये असं वाटणाऱ्या शक्ती...`; संघाच्या दसरा मेळ्याव्यातून मोहन भागवातांचा इशारा
विजयादशमी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून इस्रायल-हमास युद्ध ते भारताच्या प्रगतीवर आपलं मत मांडलं आहे.
Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाषणात इस्रायल-हमास युद्धाचा संदर्भ देत, "या युद्धामुळे जगभरातील चिंता वाढली असून, ही आग कोणाला पेटवेल हे सांगणे कठीण आहे." असं म्हणत त्यांनी हा संघर्ष जागतिक स्तरावरील अस्थिरतेचे प्रतीक असल्याचे म्हंटले आहे.
परकीय शक्ती भारताच्या प्रगतीच्या आड
मोहन भागवत यांनी भाषणात जम्मू-काश्मीरच्या शांततेत पार पडलेल्या निवडणुकांचे कौतुक केले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढल्याचे सांगितले. परंतु काही देश आणि शक्ती भारताच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्ती भारताला रोखण्यासाठी विविध डावपेच वापरतील, असा इशाराही त्यांनी दिला.
बांगलादेशातील कट्टरतावादी शक्तींचा उल्लेख केला
मोहन भागवत यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराचाही उल्लेख केला. कट्टरतावादी शक्तींमुळे अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असून हिंदू समाजाने संघटित होण्याची गरज असल्याचेही त्यांनी आव्हान केले. समाज कमकुवत होऊ नये म्हणून हिंसाचाराचा अवलंब न करता संघटित राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या विकासामुळे अनेक देशांचे हित दुखावले जात आहे
मोहन भागवत यांनी भारताच्या विकासामुळे अनेक देशांचे हित दुखावले जात आहे अशी चिंता व्यक्त केली. बांगलादेशमध्ये भारताविरोधात सुरू असलेल्या अफवांवर ज्यामध्ये भारताकडून धमकीचे चित्रण करून पाकिस्तानशी युती करण्याची चर्चा आहे. यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय ज्यांना भारताची प्रगती नको आहे, अशा शक्तींचे हे षड्यंत्र आहे असेही ते म्हणाले.
आरजी कर हॉस्पिटल घटना
कोलकत्ता येथे आरजी कार हॉस्पिटलच्या घटनेबद्दल बोलताना भागवत यांनी ही घटना समाजासाठी लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. अशा घटनांमुळे समाज कलंकित होत असून आपण याबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे.याशिवाय देशातील सणांवरही भाष्य करत विभाजन टाळून सर्वानी सर्व सण एकत्र साजरे केले पाहिजेत,असेही ते म्हणाले. आरजी कर हॉस्पिटलमध्ये जे घडले ते लज्जास्पद आहे. ही घटना घडल्यानंतरही ज्या प्रकारची दिरंगाई झाली, त्यातून गुन्हेगारी आणि राजकारण यांची सांगड दिसून येते. एकंदरीत घर, कुटुंब आणि कायदा आणि सुव्यवस्था यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
मुलांच्या हातातील मोबाईलवर नियंत्रण नाही
काहीही लपलेले नाही. आजकाल प्रत्येक मुलांच्या हातात मोबाईल असतो. ते त्यावर काय पाहत आहेत यावर कोणाचेही नियंत्रण नाही. अनेक ठिकाणी तरुण पिढी ड्रग्जच्या जाळ्यात अडकत चालली आहे. याचे अनेक विपरीत परिणाम होत आहेत.