नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) इतरांवर स्वत:चे विचार लादण्याची गरज नाही. आजवर संघाने कधीही विरोधकांवर बंदी आणली नाही. प्रत्येक गोष्ट RSSच्या माध्यमातूनच झाली पाहिजे, असा आमचा आग्रह नाही. किंबहुना तसे झाले तर तो संघाचा पराभव ठरेल, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते मंगळवारी दिल्लीत 'आरएसएस- रोडमॅप फॉर द 21 सेंचुरी' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मोहन भागवत यांनी म्हटले की, संघाला आपले विचार लादण्याची गरज नाही. कारण, संघाच्या वर्तुळात सातत्याने विचारमंथनाची प्रक्रिया सुरुच असते. ही प्रक्रियाच संघाची कार्यपद्धती आहे. संघात हिंदूराष्ट्र आणि हिंदुत्व या दोनच गोष्टी शाश्वत आहेत. त्यामध्ये कदापि बदल होणार नाही, असे मोहन भागवत यांनी सांगितले.


जोपर्यंत देशात शेवटचा हिंदू आहे तोवर हिंदूराष्ट्र आहे. आपले जीवन स्वार्थासाठी नव्हे तर परमार्थासाठी आहे. हीच भारताची संकल्पना आहे. संघ लोकांच्या आचरणात बदल घडवण्याचे काम करतो. संपूर्ण समाज संघटित व्हावा, असे संघाला वाटते. यामध्ये सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येकाने देशाला सामर्थ्यशाली करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही भागवत यांनी म्हटले. 


तसेच संघाने विरोधात लिहणाऱ्यांवर कधीही बंदी आणली नाही. इतकेच काय आम्ही विरोधी विचार वाचण्यासही मज्जाव करत नाही. हे संघाचे वैचारिक स्वातंत्र्य आहे. स्वयंसेवक होण्यासाठी कोणतीही अट नाही. मात्र, एकदा संघाचे कार्यकर्ते झाल्यानंतर तुमच्याकडून अपेक्षा असतात, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.