उत्तर प्रदेशच्या विधानसभेत राज्यपाल राम नाईकांवर आमदारांनी फेकले कागदाचे बोळे
या गोंधळादरम्यान सपाचे आमदार सुभाष पासी बेशुद्ध पडले.
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मंगळवारी जोरदार गोंधळ झाला. यावेळी विरोधी पक्षांच्या आमदारांची मजल थेट राज्यपाल राम नाईक यांच्यावर कागदाचे बोळे फेकण्यापर्यंत गेली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांच्या अभिभाषणावेळी हा प्रकार घडला. यावेळी राज्यपाल राम नाईक यांनी आपल्या भाषणात योगी सरकारची धोरणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. यावर नाराज झालेल्या विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी विरोधक सभागृहातील मोकळ्या जागेत येत राज्यपालांसमोर फलक नाचवत घोषणा देत होते. मात्र, राज्यपालांनी आपले भाषण सुरुच ठेवले. यानंतर विरोधकांनी कागदांचे गोळे फेकतानाच चले जावचे नारे दिले. यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळादरम्यान सपाचे आमदार सुभाष पासी बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सभागृहाचे कामकाज ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. सपा आणि बसपाच्या आमदारांनी राज्यपालांच्या भाषणात व्यत्यय आणून त्यांचा अपमान केला आहे. राज्यपाल राम नाईक हे त्यांचे भाषण वाचत होते आणि हे आमदार अभद्रतेची सीमा ओलांडत होते. कोणत्याही अधिवेशनामध्ये त्याआधी सर्वपक्षीयांमध्ये चांगल्या प्रकारे वागण्याबाबत बोलतात. मात्र, जेव्हा कामकाज सुरु होते तेव्हा वेळ वाया घालवला जातो, अशी टीका योगींनी केली.