दिल्ली : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या (Zomato) जाहिरातीमध्ये महाकाल (Mahakal) मंदिराच्या प्रसादाचे नाव आल्याने वाद निर्माण झाला आहे. उज्जैनमधील (Ujjain) महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी या जाहिरातीचा निषेध नोंदवला असून अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि कंपनीने माफी मागावी अशी मागणी केली आहे. कंपनीने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही जाहिरात त्वरित बंद करण्याची मागणीही पुजाऱ्यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जाहिरातीमध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसत आहे. यामध्ये अभिनेता हृतिक रोशन म्हणतोय की, "थाली का मन किया उज्जैन में हैं, तो महाकाल से मंगा लिया". 


यावर आता महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेत याचा निषेध नोंदवला आहे. महाकाल मंदिरातून अशी कोणतीही थाळी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, अगदी उज्जैनमध्येही पोहोचवली जात नाही, असे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे झोमॅटो आणि हृतिक रोशनने माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे.


महाकाल मंदिराचे पुजारी महेश शर्मा म्हणाले की, कंपनीने अशा जाहिराती देण्यापूर्वी विचार करायला हवा. हिंदू समाज सहिष्णू आहे. तो कधीच चिडत नाही. दुसरा कुठला समाज असता तर अशा कंपनीला आग लागली असती. कंपनीने अशा प्रकारे आमच्या भावनांशी खेळू नये. कंपनीने ही दिशाभूल करणारी जाहिरात केली आहे, ती तात्काळ थांबवावी.


 



महाकाल मंदिर भोजन परिसरात थाळीमध्ये भाविकांना जेवण दिले जाते. मात्र थाळीचे जेवण बाहेर पोहोचवण्याची व्यवस्था नाही. जी कंपनी मांसाहारी पदार्थही पुरवत आहे, त्यांनी तात्काळ महाकाल थाळीच्या नावाने दिशाभूल करणारी जाहिरात बंद करावी. कंपनीने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. याला आमचा तीव्र विरोध आहे. कंपनीने माफी मागितली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असेही शर्मा म्हणाले.