जीवावर उदार होऊन विद्यार्थी रोमानियात, 16000 भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार
Russia Ukraine Conflict : युक्रेन युद्धाच्या वणव्यात होरपळत आहे. अशात युक्रेनमध्ये अडकलेले हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करून रोमानिया देशात पोहोचत आहेत.
नवी दिल्ली : Russia Ukraine Conflict : रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर युद्धाला तोंड फुटले. (Russia-Ukraine war) युक्रेन युद्धाच्या वणव्यात होरपळत आहे. अशात युक्रेनमध्ये अडकलेले हजारो भारतीय विद्यार्थी (Indian students) युक्रेनची सीमा पार करून रोमानिया देशात पोहोचत आहेत. दरम्यान, भारतीयांसाठी सर्वात मोठ्या आणि अवघड बचाव मोहिमेला सुरुवात झाली आहे. 16 हजार भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणण्यात येणार आहे. एअर इंडियाची विमाने रवाना होणार आहेत.
रोमानियातून या विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणले जाणार आहे. त्यामुळे रशियाच्या सततच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे विद्यार्थी जीवावर उदार होऊन रोमानियात पोहोचत आहेत.
युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी भारत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. अडकलेल्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार विमाने पाठवणार आहे. रोमानिया आणि हंगेरी मार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यात येणार आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधावा आणि रोमानिया, हंगेरीच्या सीमांजवळ यावं, असं सांगण्यात आलंय. अडकलेल्या नागरिकांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी रोमानिया, हंगेरीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने विशेष अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या देशांच्या सीमांकडे येताना बस किंवा खासगी वाहनांमधून येताना भारताचा झेंडा लावावा, अशी सूचना देण्यात आली आहे.