पालक्कड: अय्यप्पा स्वामी मंदिर म्हणजे केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्यावरुन सध्याच्या घडीला वातावरण फारच चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी असल्याचा निर्णय दिला होता. ज्या निर्णयानंतर संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे हिंदुत्ववादी संघटनानंनी केरळमध्ये महिलांच्या मंदिर प्रवेशाला तीव्र विरोध करणं सुरुच ठेवलेलं असतानाच दुसरीकडे पालक्कड जिल्ह्यात मुस्लीम धर्मियांनी सामाजिक भान जपत शबरीमला मंदिराच्या दिशेने निघालेल्या भाविकांची मदत केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकाच वेळी दोन टोकाच्या परिस्थिती केरळमध्ये पाहायला मिळाल्या. 


हैदराबाद येथून जवळपास १५ प्रवाशांना घेऊन एक वाहन शबरीमलाच्या दिशेने जात असताना कुंझलमंडम येथे त्या वाहनाचा अपघात झाला. त्याचवेळी रस्त्यावरुन काही स्थानिक हे नजिकच्या मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी जात होते, ज्यांनी हा अपघात पाहिला. 


अपघात पाहताक्षणीच त्या मुस्लिम धर्मियांनी वाहनात असणाऱ्या भाविकांचा जीव वाचवत त्यांना मदतीचा हात दिला. 'शबरीमलाच्या दिशेने जाणाऱ्या त्या भाविकांच्या वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, त्यातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. ज्यातून सावरण्यासाठी त्यांना वेळीच मदतीचा हातही मिळाला. अपघातातून सावरण्यासाठी त्यांना लगेचच नजीकच्या मशिदीमध्ये नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांना उपहार देण्यात आला', अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. मदत मिळाल्यानंतर काही तासांतच या भाविकांनी पुन्हा आपल्या दुरूस्त करण्यात आलेल्या वाहनातून शबरीमलाच्या दिशेने प्रवास सुरू केला. 


केरळमध्ये ही घटना त्याच दिवशी घडली जेव्हा, कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी अय्यप्पा स्वामी मंदिरात प्रवेश करत वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा मोडित काढली होती. या महिलांच्या मंदिर प्रवेशानंतरच केरळमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध अधिक तीव्र झाला असून, त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनालाही अडचणी येत आहेत.