जयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट या युवा नेत्याचं नाव आघाडीवर आहे. सचिन पायलट यांचं व्यक्तिमत्व अनेक युवकांना आकर्षित करतं. सचिन पायलट हे काँग्रेसचे विश्वासू नेते राजेश पायलट यांचे चिरंजिव आहेत. राजेश पायलट यांचं रस्ते अपघातात अकाली निधन झालं. राजेश पायलट यांच्या निधनानंतर सचिन पायलट यांच्याकडे नेतृत्व म्हणून पाहिलं जावू लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन पायलट हे राजस्थानच्या दोसा लोकसभा मतदारसंघातून वयाच्या २६ व्या वर्षी खासदार झाले. सचिन पायलट हे एका मोठ्या राजकीय घराण्यात जन्माला आले असले, तरी त्यांना देखील प्रेमात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही, यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण हा विवाह आंतरजातीय नव्हता, तर आंतरधर्मीय होता.


सचिन पायलट हे अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये शिक्षण घेत होते. त्याच वेळी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची मुलगी आणि ओमर अब्दुल्ला यांची बहिण सारा अब्दुल्ला देखील सचिनसोबत परदेशात शिक्षण घेत होती. सचिन आणि सारा हे क्लासमेट होते, यांच्यात चांगलीच मैत्री जमली.


सचिन पायलट यांना सारा अब्दुल्लाचे आई वडील ओळखत होते. त्यांच्या मैत्रीबदद्ल त्यांना देखील माहिती होती. पण साराने सचिन पायलट यांच्याशी असलेल्या प्रेमाची माहिती वडील फारूक अब्दुल्ला यांना दिली, तेव्हा त्यांनी या नात्याला परवानगी देण्यास नकार दिला.


सचिन पायलट यांच्या घरी देखील परिस्थिती काही वेगळी नव्हती. सचिन मायदेशी परतल्यानंतर सारा लंडनमध्ये होत्या, यानंतरही सचिन आणि सारा हे फोनवरून संपर्कात होते. अखेर सचिन पायलट यांनी त्यांच्या घरी याविषयी परवानगी मिळवली.


पण सारा अब्दुल्ला यांना ही परवानगी मिळत नव्हती, कधी राजकीय, तर कधी धार्मिक कारणावरून, त्यांच्या लग्नाचा प्रश्न गटांगड्या खात होता. अखेर सारा आणि सचिन पायलट यांनी लग्न केलं.


यानंतर सचिन पायलट कमी वयात खासदार देखील झाले, असं म्हणतात की सचिन पायलट खासदार झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे सासरे फारूक अब्दुल्ला आणि सचिन पायलट सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसू लागले. 


फारूक अब्दुल्ला यांनी अखेर सचिन पायलट आणि सारा यांच्या नात्याला स्वीकारलं. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात सचिन पायलट यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा फारूक अब्दुला आनंदी दिसत असल्याचं सांगण्यात येतं.


सारा आणि सचिन यांना आता दोन मुलं आहेत. सचिन पायलट यांचं नाव राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून चर्चेत आल्यानंतर सचिन-साराची लव्हस्टोरी देखील चर्चेत आली आहे.